नाट्य संगीत व शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफलीसोबतच ज्येष्ठ रंगकर्मी, गायक-वादक व कीर्तनकार यांच्या सत्काराने सोहळा चांगलाच रंगला.
स्वर आराध्य संगीत प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी कला-रंगकर्मी गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पंडित कुमार पांडे, माजी प्राचार्य जयंतराव बरडे, समाजसेवक अनिल आसेगावकर, भारत गायन समाज पुणेचे विभागीय प्रमुख रमाकांत चिखलीकर, संगीत संयोजक जनार्दनपंत लाडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वरराज छोटा गंधर्व स्मृती रंगकर्मी गौरव पुरस्कार नाट्यकर्मी वत्सला पोलकमवार-आंबोणे यांना, साहेबराव तसरे स्मृती गायन व वादन अध्यापन सेवा गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. नारायणराव मंगरुळकर यांना तर शामसुंदरबुवा बुजाडे स्मृती वारकरी संगीत भक्तिसेवा गौरव पुरस्कार हभप श्रीराम महाराज जोशी यांना प्रदान करण्यात आला.
त्यानंतर 'लागी कलेजवाँ कटार' हा नाट्य संगीत व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला पं. शंकरराव वैरागकर यांची संगीत मैफल झाली. त्यानंतर मंजिरी वैद्य-अय्यर यांनी 'संगीत स्वयंवर'मधील 'नाथ हा माझा मोहि मना' हे पद सादर करून रसिकांच्या मनाची पकड घेतली. विनोद वखरे यांनी 'संगीत संशयकल्लोळ' नाटकातील 'कर हा करी धरि' हे पद अतिशय ताकदीने सादर केले तर बागेश्री मुंडले यांनी 'संगीत संत कान्होपात्रा' मधील 'पतित तु पावना' हे पद सादर केले. गुणवंत घटवाई यांनी 'संगीत मत्स्यगंधा' मधील 'देवार घरचे ज्ञात कुणाला' हे पद सादर करून रसिकांकडून टाळ्या खेचल्या. ऋतुजा लाडसे यांनी 'लपविला लाल गगन' हे पद म्हटले. 'मुरलीधर शाम', 'विकल मन आज' आदी पदे कलाकारांनी सादर केली. कलाकारांना संवादिनीवर भास्कर पिंपळे व सागर कुळकर्णी यांनी तर तबल्यावर जनार्दन लाडसे व निषाद लाडसे यांनी साथ दिली. व्हायोलिनवर सुधीर गोसावी होते. कार्यक्रमाचे निवेदन सई देशपांडे व सुजाता पटवर्धन यांनी केले. प्रास्ताविक अभिजीत बोरीकर यांनी केले तर सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रकाश वाकेकर यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट