दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना फेरमूल्यांकनात गुणवाढ झाल्यानंतरही सुधारित गुणपत्रिका न मिळाल्याने हायकोर्टात धाव घ्यावी लागली. केदार वैद्य या विद्यार्थ्याला नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी थेट हायकोर्टातच गुणपत्रिका दिली. तर केदारसमान इतर ८७ विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका देण्याचे आश्वासन मंडळ अध्यक्षांना द्यावे लागले.
दहावीत उत्तम गुण मिळालेल्या केदार वैद्य याला समाज विज्ञानात ८७ आणि विज्ञानात ९० गुण मिळाले. त्याला गणितात १०० आणि संस्कृतमध्येही १०० गुण आहेत. विज्ञान व समाजविज्ञानातील कमी गुणांमुळे त्याने उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मागितली होती. तसेच त्या उत्तरपत्रिका त्याने इतर शिक्षकांकडून तपासून घेतल्या. तेव्हा समाजविज्ञान आणि विज्ञानात आणखी काही गुण वाढण्याची शक्यता असल्याचे शिक्षकांनी त्याला सांगितले. त्यामुळे केदारने फेरमूल्यांकनाकरिता अर्ज केला. त्यात त्याला विज्ञानात ९४ आणि समाज विज्ञानात ९३ गुण मिळालेत. तेव्हा सुधारित गुणपत्रिका मिळावी त्यासाठी त्याने शिक्षण मंडळाकडे अर्ज केला. परंतु, मंडळाचे अध्यक्ष नागपुरात नसल्याने गुणपत्रिका आणखी आठ दिवसांनी मिळेल, असे त्याला कळविण्यात आले. दरम्यान, अकरावी प्रवेशाची आता प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यात सुधारित गुणपत्रिका न मिळाल्यास जुन्या गुणांवरच गुणवत्ता यादीत स्थान मिळेल, अशी शक्यता निर्माण झाले. तेव्हा केदार वैद्यने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यात सुधारित गुणपत्रिका तातडीने देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आले. तेव्हा हायकोर्टाने मंडळ अध्यक्षांना प्रत्यक्ष उपस्थित राहून दुपारच्या सत्रातच गुणपत्रिका देण्याचा आदेश दिला. त्यानुसार केदार वैद्यला सुधारित गुणपत्रिका देण्यात आली. केदारप्रमाणचे सुमारे ८७ विद्यार्थीही गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा त्या विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिका देण्याचा आदेश देण्यात आला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. भानुदास कुळकर्णी व अॅड. केतकी जलतारे यांनी तर मंडळाच्यावतीने अॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट