राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विविध कोर्सला यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने कॉलेजेसने प्रवेश क्षमतेत वाढ करून देण्याची मागणी केली आहे. परंतु, राज्य सरकारकडून २० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमता वाढ केल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
यावर्षी अनेक कॉलेजेसमध्ये कला, वाणिज्य व विज्ञानाचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. तर मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. इंजिनीअरिंग, मेडिकल व इतर व्यवसायिक कोर्सेसकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत तात्पुरते प्रवेश घेतल्याने ही समस्या निर्माण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, शहरातील नामवंत कॉलेजेसमध्ये सुमारे २०० ते ३०० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी एकूण प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक आहे. त्याकरिता काही संस्थांनी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे किमान २० टक्के प्रवेश क्षमता वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सरसरकट प्रवेश क्षमता वाढ केल्यास ज्या कॉलेजेसमध्ये मागणी नाही तिथे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या क्षमता वाढीला नियमानुसार राज्य सरकारची परवानगी मिळणे ही आवश्यक आहे. तेव्हा कॉलेजेसने राज्य सरकारकडे दाद मागावी. सरकारने प्रवेश क्षमतेत वाढ केल्यास मागणीनुसार विद्यापीठाकडून तशी मंजुरी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता कॉलेजेसकडून प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचे प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे. त्यासोबतच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संख्याही विद्यापीठाला कळवावी लागणार आहे. त्यानंतरच कॉलेजनिहाय प्रवेश क्षमता वाढ होईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट