'विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन समाजातील सर्व लोकांचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि उद्योजक यांनी समन्वय साधून समाजाचा उद्धार कसा होईल, यावर भर द्यावा. काहीतरी नावीन्यपूर्ण करून समाजाला व स्वतःला एक वेगळी ओळख करून दिली पाहिजे', असे आवाहन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी केले.
जी. एच. रायसोनी इंजिनीअरिंगचा तृतीय पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. या समारंभास आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) समूहाचे संचालक डॉ. राजीव संघल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, तंत्र शिक्षण संचालनालयाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनिलजी रायसोनी, जी. एच. रायसोनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज आदी उपस्थित होते.
'डॉं. होमी भाभा यांनी आण्विक शक्ती कार्यक्रम राबविला. टीआयएफआर, बीएआरसी, आयजीसीएआर यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या केल्या. डॉ. विक्रम साराभाई यांनी इस्रोसारखी संस्था उभी केली. उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून या संस्थेने देशाचा गौरव वाढविला. डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनी हरीत क्रांती आणली आणि नागरिकांना अन्न सुरक्षा दिली. अशा अनेकांनी देशाच्या प्रगतीत आपला वाटा दिला. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे. त्यांनी नवनवीन संशोधनाचे मार्ग निवडून देशाला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देण्यासाठी पुढे यावे', असे आवाहन डॉ. सारस्वत यांनी यावेळी केले.
'भारतातील प्रेरणास्त्रोतांद्वारे इको प्रणालीचा वापर करून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जागतिक दर्जाच्या संस्थांची स्थापना करण्यात येत आहे. भारतातील विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक देश इच्छूक आहेत. देशातील युवकांसाठी ही मोठी संधी असणार आहे. येणारी पिढी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील', असा विश्वास डॉ. सारस्वत यांनी व्यक्त केला.
गुरुकुल पद्धतीच हवी प्राचीन काळात गुरुकुल पद्धती होती. गुरुकुलात सत्यावर आधारीत शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जीवनात करण्यात येत होता. त्याचप्रमाणे आजच्या तांत्रिक युगातही तसेच धोरण विद्यार्थ्यांनी अवलंबावे. स्वक्षमतेवर विश्वास व कठोर मेहनत याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याचा उपयोग समाजाला करून द्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. काणे यांनी केले.
दीड हजार विद्यार्थ्यांना पदवी स्नातक समारंभात १ हजार ३४२ विद्यार्थ्यांना (१०२७ पदवी ऑटोनॉमी, ५ पदवी आरटीएमएनयू आणि ३१० पदव्युत्तर) पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच २५ गुणवंत विद्यार्थ्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले. ७ यूजी आणि १५ पीजी विद्यार्थ्यांना रौप्यपदके आणि पदवी आणि पदव्युत्तर विभागातून अत्युच्च दर्जा मिळविणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट