रमजान महिन्याचे रोजे (उपवास) हे अत्यंत कडक असतात. दिवसभरात पाण्याचा थेंबही न पिता हे उपवास केले जातात. त्यामुळे अशा काळात 'फिटनेस'कडे दुर्लक्ष होते. परंतु, या काळात नेमके कोणते व्यायाम करता येऊ शकतात, यावर संशोधन करून व्यायामाच्या या प्रकारांचे एक अॅपच तयार करण्यात आले आहे. या अॅपद्वारे 'फिटनेस'चे वेड असलेल्या मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले जात आहे.
रमजान महिन्याच्या निमित्ताने बरेच नवीन अॅप्स आले आहेत. यातीलच एक म्हणजे 'रमजान फिटनेस चॅलेन्ज अॅप' होय. रमजानच्या महिन्यात कडक उपवास पाळताना व्यायाम करणे सहसा जमत नाही. परंतु, उपवास जसा शरीराकरिता चांगला असतो, तितकाच व्यायामसुद्धा महत्त्वाचा असतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या अॅपद्वारे दैनंदिन 'वर्क आउट'करिता काही 'चॅलेन्जेस' पाठविली जातात. काही तज्ज्ञांनी या महिन्याकरिता विशेष अशा १२ व्यायामप्रकारांचा अभ्यास केला आहे. या प्रकारांचे 'चॅलेन्जेस' फिटनेसप्रेमींना अॅपद्वारे पाठविले जातात. तसेच या अॅपद्वारे दररोज योग्य त्या वेळेस तुम्हाला व्यायामाची आठवणसुद्धा दिली जाते. जगभरातील हजारो मोबाइल युजर्स हे अॅप वापरत आहेत.
अन्नदान करा ऑनलाइन
जगातील प्रत्येक धर्मात अन्नदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच ते मुस्लिम धर्मासुद्धा करण्यात आले आहे. रमजान हा सगळ्यात पवित्र महिना असल्याने या महिन्यात अन्नदानाला विशेष महत्त्व येते. परंतु, पोट भरलेल्याला अन्नदान करण्यात काहीही अर्थ नसतो. त्यामुळे जगात ज्या ठिकाणी अन्नधान्याची कमी आहे, तेथे अन्नदान करता यावे, याकरिता एक अॅप तयार करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत लॅबेनॉन येथील गरीब सिरीयन मुलांना अन्नदान करता यावे याकरिता 'शेअर युअर मील' हे अॅप सुरू करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही अन्नदानाकरिता अर्थसहाय्य करू शकता. रमजान महिन्याचे महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघाने खास अरेबिक भाषेत हे अॅप सुरू केले आहे. जगभरातील अनेक मुस्लिम बांधव या अॅपद्वारे अन्नदान करीत आहेत.
असे आहेत अॅप्स
रमजान लिगसी : रमजान महिन्याचे महत्त्व पटवून देणारे तसेच या महिन्यात काय काय करायचे आहे, याची माहिती देणारे हे अॅप आहे.
आय कुराण : मुस्लिम धर्मात कुराणला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अॅपद्वारे कुराणचा संदेश पोहचविला जातो. ऑनलाइन बाजारात या अॅपला सगळ्यात जास्त मागणी आहे.
अदान प्रो : रमजान महिन्यादरम्यान प्रार्थनेला (नमाज) विशेष महत्त्व प्राप्त होते. या महिन्यादरम्यान नमाजच्या वेळा, नमाजकरिता किब्लाची दिशा (मक्काची दिशा) तसेच हदिथ याची माहिती या अॅपद्वारे दिली जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट