Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

इफ्तारवरून उडाला चर्चांचा धुराळा

$
0
0

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले. त्यानंतर, संघाच्यावतीने त्यावर अधिकृत प्रतिक्रिया आली आणि त्यातून इफ्तार पार्ट्यांपासून संघ दूर असल्याचे सांगितले. संघाचे हे आयोजन नसून, मुस्लिम मंचाचा तो कार्यक्रम असल्याचे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले. या प्रश्नावर संघाशी संबंधित संघटना तसेच विरोधी विचारांच्या संघटनांच्या प्रतिक्रिया 'मटा'ने जाणून घेतल्या.

संघाने मुस्लिमांची काळजी करू नये

राष्ट्राची मागणी करणाऱ्या संघाने मुस्लिमांची काळजी करू नये. संघ आणि भाजप मुस्लिमांना खोटी आश्वासने देत आहे. अचानक हे मुस्लिमप्रेम कसे काय उफाळून आले? रमजानचा महिना याचवर्षी आला का? संघाने मुस्लिमांना भ्रमित करू नये. आधी सरसंघचालकांनी मुस्लिम टोपी परिधान करावी आणि मग मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी कराव्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.

संघाचा दुटप्पी चेहरा उघड

सब का साथ, सब का विकास म्हणणाऱ्यांचा हिंदुत्व हाच छुपा अजेंडा आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने रा. स्व. संघाचा दुटप्पी चेहरा पुढे आला आहे. संघाचे खरे स्वरूप हे गोळवलकर प्रणित हिंदू राष्ट्राचेच आहे. इफ्तार पार्टी वगैरे आयोजित केल्या जात असल्या तरी संघाचा दुटप्पी चेहरा उघडा पडतो आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

संघ सर्वांपासून समान अंतरावर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेप्रमाणेच राष्ट्रीय मुस्लिम मंच ही स्वतंत्र संघटना आहे. जसा अभाविपच्या प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयसंवेक संघाचा सहभाग नसतो, तसाच तो मुस्लिम मंचाचा कार्यक्रमात नसतो. याचा अर्थ, मंचाने इफ्तार पार्टी घेण्याला कुणाचाच विरोध नाही. संघाशी संबंधित असलेल्या सर्वच संघटनांपासून संघ सारख्या अंतरावर असतो. यामध्ये कुठेही दुटप्पीपणा नाही, असे अभाविपचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री सुरेंद्र नाईक म्हणाले.

मुस्लिमांना हिंदुत्व सांगण्याचा उद्देश नाही

संघ आणि संघ परिवारातील इतर संघटना सर्वच संस्कृतींचा आदर करतात. या संस्कृतींमध्ये संवाद स्थापन करण्याचे काम सतत सुरू आहे. मुस्लिम मंचाने आयोजित केलेली इफ्तार पार्टी हे याच संवाद प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचे रूप आहे. तो मंचाचा उपक्रम आहे. त्यात यश आले तर त्याचे श्रेय काही रा.स्व.संघ घेणार नाही. त्या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याची गरज नाही, असे इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे केंद्र समन्वयक मनन देशपांडे म्हणाले.

हे तर संघाचे ढोंग

मुस्लिमांना आधी काँग्रेसने 'बनवले' आणि आता संघ-भाजप त्यांची फसवणूक करीत आहे. दोन्ही संघटनांमध्ये काहीही फरक नाही. संघाचा दुटप्पीपणा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बाबरी प्रकरणातही हाच दुटप्पीपणा दिसून आला होता. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण दिले जावे असे हायकोर्टाचे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही. मुस्लिमांच्या हिताचे मुद्दे उचलण्याऐवजी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे विदर्भ प्रवक्ते शकील पटेल यांनी दिली.

कार्यक्रम संघाचा म्हणणे अयोग्य

संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या संस्थांचा संघ परिवारात समावेश होतो. त्या अर्थाने राष्ट्रीय मुस्लिम मंच हा परिवाराचा भाग नाही. ते मुस्लिमांनी मुस्लिमांसाठी सुरू केलेले चांगले काम आहे. देशभरात अनेक चांगली कामे सुरू असतात व संघाशी त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. तसेच चांगले संबंध मुस्लिम मंचाशीही आहेत. त्यामुळे, मंचाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला संघाचा कार्यक्रम म्हणणे योग्य ठरणार नाही, असे संघाचे अ.भा. प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles