यंदा मान्सूनने विदर्भात जवळपास दहा दिवस विलंबाने धडक दिली. महाराष्ट्रातील मान्सून दहा वर्षात पहिल्यांदाच पूर्वेकडून सक्रीय झाला. पण त्यानंतर ३० जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात हवा तसा पाऊस पडलाच नाही. केवळ पश्चिम विदर्भातील काही प्रमाणात पडलेल्या अतिरिक्त पावसामुळे जूनचे पर्जन्यमान सरासरीवर तरी आले. पण आता मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होईल, आशा निर्माण झाली आहे. स्कायमेट या खासगी हवामान पोर्टलनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाब आंध्रप्रदेश-ओरिसा सीमेवरुन झारखंड, छत्तीसगड, विदर्भाच्या दिशेने सरकत आहे. यामुळे विदर्भात काही ठिकाणी बुधवारी तब्बल ११७ तर पुढील शुक्रवारी ५९ मि.मी. पावसाचा अंदाज आहे. तर हवामान खात्यानेदेखील विदर्भात पुढील पाच दिवसांत ५० टक्के भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागराप्रमाणेच मान्सून अरबी समुद्राकडूनदेखील विदर्भात सक्रीय होत असल्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपासून अरबी समुद्रातील कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणारा पाऊस खान्देशपर्यंत आला. खान्देशातून तो पश्चिम विदर्भात व त्यानंतर शनिवारी सायंकाळी वर्धेतही काही भागात जोरदार बरसला. तर यामुळे नागपूर शहरातदेखील दोन दिवसांच्या हलक्या पावसानंतर शनिवारी रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. त्याआधी सायंकाळी पश्चिम दिशेने आलेल्या ढगांमुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले. त्यातून रात्री उशीरापर्यंत मध्यम पाऊस सुरू होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट