पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीनुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे घोषित करण्यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्याच्या विविध भागांतील अनेक वन्यक्षेत्रे महाराष्ट्राने संवेदनशील क्षेत्रे म्हणून घोषित केली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने या बाबतीत आघाडी घेतली असून, त्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनास हातभार लागणार आहे.
महाराष्ट्रात ५४ वन्यजीव संरक्षित क्षेत्र असून त्यात सहा राष्ट्रीय उद्याने व ४८ अभयारण्याचा समावेश आहे. आतापर्यंत केंद्र शासनाने यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील पाच संरक्षित क्षेत्रे व कर्नाळा अभयारण्य अशी एकूण सहा क्षेत्रे संवेदनशील घोषित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली होती. या सभेत पेंच व्याघ्रप्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, टिपेश्वर अभयारण्य, जायकवाडी अभयारण्य या क्षेत्राच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे प्रस्ताव अंतिम केले आहे. राज्य वन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावांना केंद्र शासनाने काहीही बदल न करता स्वीकारले आहे. या चार प्रस्तावाची छाननी तांत्रिक समितीच्या वतीने केल्यानंतर करून पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. समितीने यापूर्वी १४ प्रस्तावांवर चर्चा करून त्यांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पैनगंगा, उमरेड-कऱ्हांडला, लोणार, सागरेश्वर, ज्ञानगंगा, भामरागड, फंसल, गांगेवाडी आणि इतर अभयारण्याचा समावेश आहे. या क्षेत्राच्या प्रस्तावांची तांत्रिक छाननी करून अंतिम अधिसूचना प्रकाशित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यावर आहे.
या शिवाय, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तानसा, मयुरेश्वर, सुपे, चपराळा, राधानगरी, प्राणहिता, यावल अभयारण्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. बोर व्याघ्रप्रकल्पाचा एकमेव प्रस्ताव राज्य शासनाकडे तर इतर पाच प्रस्ताव वन विभागाकडे प्रलंबित आहेत. मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यामुळे वन्यजीव संरक्षित क्षेत्राला लागून असलेल्या परिसरात पर्यावरणीय समतोल बिघडविणाऱ्या हालचालींवर नियंत्रण येईल असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट