दारू न पाजल्याने तिघांनी नितीन बाबूराव शेंदरे (४२) यांच्यावर देशीकट्ट्यातून गोळीबार केला. मात्र, गोळी भिंतीला लागल्याने नितीन थोडक्यात बचावले. कन्हानमधील बर्थ डे पार्टीत ही थरारक घटना घडल्याने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी दादा मुळे, मिलिंद काळे व त्याच्या एका सहकाऱ्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नितीन यांचे ऑटोमोबाइलचे दुकान आहे. बुधवारी एरिगेशन कॉलनी येथील पुष्पाबाई बळीराम नागपुरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातेवाइकांनी पार्टी आयोजित केली होती. यासाठी नितीन व त्यांचे मित्र तेथे गेले. रात्री १०.३० वाजता दादा मुळे हा नितीन यांच्याजवळ आला व 'दारू पाज', असे दादा म्हणाला. 'मी तुला कशाला दारू पाजू' ,असे नितीन त्याला म्हणाले. त्यामुळे संतप्त होऊन दादाने जवळील खुर्ची उचलून नितीन यांना मारली. त्यांच्या डोक्याला ती लागली.
दोघांमध्ये हाणामारी झाली. अन्य लोकांनी वाद सोडविला. तिघेही तेथून गेले. दहा मिनिटांनी दादा, मिलिंद व त्याचा साथीदार परत तेथे आले. दादा याने नितीन यांना मागाहून पकडले. त्यांच्या कानशिलावर देशीकट्टा लावून जीवे मारण्याची धमकी दिली. नितीन यांनी देशीकट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दादा याने गोळी झाडली. सुदैवाने ती नितीन यांना न लागता भिंतीला लागली. त्यानंतर नितीन यांनी दादा याच्या हाताला झटका दिला. देशीकट्टा खाली पडला. त्यानंतर दादा याने चाकूने नितीन यांच्यावर हल्ला केला. नागरिक धावले असता तिघेही चाकू, देशीकट्टा घेऊन तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध सुरू केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट