अजनी रेल्वेपुलावर पडलेल्या भगदाडावर सिमेंट काँक्रीटचा थर देऊन रेल्वेने तात्पुरती व्यवस्था केली आहे. दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या अजनी पुलावर दहा दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडले होते. 'मटा'ने हा विषय ठळकपणे प्रसिद्ध केला होता. या पुलाचे एकूण वय पाहता या ठिकणी नवीन पूल बांधणेच आवश्यक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने तेथे तात्पुरती डागडुजी केली आहे.
हा पूल बांधला, साधारणतः त्याच काळात पोद्दारेश्वर राम मंदिराजवळही उड्डाणपूल बांधला होता. आता रामझुल्यामुळे तेथील जुना पूल पाडण्यात आला आहे. पण, अजनीचा पूल मात्र अजूनही तसाच आहे. नागपूर रेल्वेस्थानकाजवळील जुना पूल अगदी सहा महिने आधीपर्यंत होता पण त्यावरील जड वाहतूक गेल्या २५ वर्षांपासूनच बंद करण्यात आली होती, पण अजनी पुलावरून अजूनही जड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू आहे. ज्या ठिकाणी हे भगदाड पडले होते तेथून एकादे वाहन गेल्यास पुलावरून सरळ रुळावर खाली कोसळण्याची भीती आहे.
मात्र सध्या रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक लावून काँक्रीटीकरण केले तसेच त्यावर छोटे लोखंडी खांब लावले आहे. प्रत्यक्ष भगदाड असलेल्या जागेवरून कोणी जाऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. मात्र ही केवळ मलमपट्टी असल्याची टीका नगरसेवक तनवीर अहमद यांनी केली आहे. या पुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. अहमद यांनी चार दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर डांबरीकरण केले. डांबरीकरण सुरू असल्याने अनेकजण बाजूने जायचे. यात भगदाडातून पडण्याची भीती अधिक होती. त्यामुळे तेथे ही तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. या पुलावरून जड वाहनांची वाहतूक ताबडतोब बंद करावी व येथे जुना पूल पाडून नवा पूल बांधण्याचे काम हाती घ्यावे, अशा मागण्या अहमद यांनी केल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट