'२४ बाय ७' पाणी देण्याचे पोकळ आश्वासन देणाऱ्या नागपूर महापालिकेने नागपूरकरांना दिलेली अनेक आश्वासने पाळली नाहीत. चुकीच्या कंत्राटांमुळे शहरातील व्यवस्थाही पार कोलमडून गेली आहे. ओसीडब्ल्यू कंपनी, वंशनिमय कंपनी यासह रस्त्यांचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांनी शहर भकास केले आहे', असे आरोप करीत शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह महेश श्रीवास, युवराजशिव, प्रशांत धवड, प्रज्ञा बळवाईक, बंटी शेळके, आमीर नुरी, योगेश तिवारी, नागेश निमजे, हसमुख सागलाणी आदी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होत महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. शहर विकासात अनेक अडथळे निर्माण करणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर रोष व्यक्त करत काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले. या झटापटीत मुख्य प्रवेशद्वाराच्या काचाही फुटल्या. आम्ही काचा फोडल्या नाहीत, असे सांगत 'नवीन काचा बसवून देऊ', असे विकास ठाकरे म्हणाले.
कुठे गेला विकास?
स्मार्ट सिटीच्या नावावर शहराच्या विकासाचे चित्र रंगविणाऱ्या भाजपने शहराची वाटचाल अधोगतीकडे नेली. ओसीडब्ल्यू कंपनीने ग्राहकांना वेठीस धरले. २४ तास पाण्याचे केवळ स्वप्न दाखविणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीकडून ग्राहकांना लुटले जात आहे. शहरातील रस्ते उखडले गेले आहेत. या कामांत भ्रष्टाचार होत आहे. वंशनिमय कंपनीबाबत तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी आदेश दिले होते. त्या आदेशांचे काय झाले? महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या कंपनीवर गुन्हा का दाखल झाला नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. विनापरवानगी केबल डक्ट पॉलिसीचे उल्लंघन केले जात आहे. चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. महापौरांच्या आदेशाचेही पालन झाले नाही. घाटावर लाकूड पुरविणाऱ्या महेश ट्रेडींग कंपनीने गैरव्यवहार केला आहे. लेखा परीक्षण अहवालात या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला असून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. यासह अनेक कामे बोगस करणाऱ्या कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करत शहरात विकास कुठे आहे, असा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट