शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट ट्रॉमा केअर युनिटमध्ये शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. मात्र, अतिसंवेदनशील काळात ट्रॉमामध्ये उपचार होत असताना डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. ट्रॉमामध्ये साधे सीसीटीव्हीदेखील नाहीत. त्यामुळे डॉक्टर आणि येथे सेवा देत असलेल्या मनुष्यबळात असुरक्षिततेची भावना आहे.
मेडिकलमध्ये ७० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. १२३ सुरक्षारक्षक येथील सुरक्षेसाठी तैनात असतात. याउपरही दीड वर्षात डॉक्टरांवर नऊवेळा हल्ले झाले. त्या तुलनेत ट्रॉमा केअर युनिटमध्ये एक सुरक्षारक्षक तैनात असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॉमा केअर युनिटचे उद्घाटन झाले. ३० खाटांचा ट्रॉमा सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी तीन जणांचा जीव वाचविण्यात सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या पथकाला यश आले. परंतु, ट्रॉमामध्ये उपचार सुरू असताना रुग्णाला वाचवण्यासाठी केवळ गोल्डन अवर असतो. या काळात रुग्ण बचावला तर त्याचा जीव वाचू शकतो, अन्यथा उपचारावर शंका घेणारे नातेवाईक असतात. यामुळे ट्रॉमा केअर युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्या खटके उडून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. ट्रॉमामध्ये रुग्णसेवेचा धर्म निभावण्यासाठी शंभरावर पदे मंजूर झाली. परंतु यात सुरक्षारक्षकांची मागणी नाही.
अशी हवी सुरक्षा
राज्यभरातील डॉक्टरांवर सुमारे ३१ हल्ले झाले. यापैकी ९ हल्ले मेडिकलमधील आहेत. ट्रॉमा युनिटमध्ये सुमारे १५ सुरक्षारक्षकांची गरज आहे. याशिवाय १४ सीसी कॅमेरे, पाच वॉकीटॉकीसह मेटल डिटेक्टरसह डोअरफ्रेमची गरज आहे. तसेच ट्रॉमाच्या सभोवताल सीसी कॅमेरे लावणे आवश्यक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट