महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात होणाऱ्या आरोपांना संघ परिवारातून आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली असून, नाहक बदनामी करणारे आरोप खपवून घ्यायचे नाहीत, असा पवित्रा परिवाराने स्वीकारला आहे. गांधीहत्येबाबत संघाचा उल्लेख करणाऱ्या एका पत्रकाराविरोधात नवी दिल्लीच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल झाली असून संघ स्वयंसेवकाच्या माध्यमातून ही तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केली होता. या आरोपाबद्दल माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांना दिला होता. भिवंडी येथील संघाच्या शाखा कार्यवाहच्या तक्रारीवरुन हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. अशीच तक्रार महिला पत्रकार राणा अय्युब यांच्याविरोधात नवी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे करण्यात आली आहे.
अभिमन्यू त्यागी या संघ स्वयंसेवकाच्या नावाने ही तक्रार देण्यात आली आहे. राणा अय्युब यांनी आपल्या ट्विटमध्ये संघाबद्दल चुकीचा मजकूर प्रसृत केला होता. हरिजन आणि मुस्लिम यांना भारतात समान हक्क असल्याचे महात्मा गांधी यांचे म्हणणे होते. त्यामुळे संघाच्या लोकांनी गांधी यांची हत्या केली, असे अय्युब यांनी आपल्या १९ जुलैच्या ट्विटमध्ये म्हटले होते. कोणतेही पुरावे नसताना करण्यात आलेले हे आरोप तथ्यहीन आहेत. कोणत्याही पुराव्यांविना हे आरोप होत असून संपूर्ण संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि संघाच्या स्वयंसेवकांमध्ये राग निर्माण होऊ शकतो, असे दिल्ली पोलिसांना सादर केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे. सायबर सेलने याबाबत आवश्यक ती मागणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दिल्लीत सादर केलेल्या या तक्रारीची प्रतही स्वयंसेवकांसह विविध ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली आहे.
आरोप खपवून घ्यायचे नाहीत!
गांधीहत्येबाबत संघावर होणारे आरोप खपवून घ्यायचे नाही आणि त्यांना योग्य प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, अशी भावना संघ परिवारात आहे. गेली ९० वर्षे काम करणाऱ्या संघटनेवर कोणतेही पुरावे नसताना हे आरोप केले जातात. त्यांना कायद्याच्या भाषेत प्रत्युत्तर द्यायचे अशी स्वयंसेवकांची भावना आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा प्रकारे स्वयंसेवक वैयक्तिकरीत्या तक्रारी दाखल करीत आहेत. ते जसे संघाचे कार्यकर्ते आहेत तसेच देशाचे नागरिकही आहेत. त्यामुळे ते वैयक्तिक तक्रारी करु शकतात, असे संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, संघाच्या वतीने ही अधिकृतरीत्या अशी कोणतीही तक्रार दाखल अद्याप दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, आक्रमक प्रत्युत्तर देण्याच्या या कृतीला संघ परिवाराचे समर्थन असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट