राज्यातील वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स कधी बंधनकारक करणार, असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या परिवहन विभागाला केला आहे. त्याबाबत दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला.
केंद्र सरकारने २००१ मध्ये मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करून सर्वप्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशभरातील राज्यांनी नव्या नंबर प्लेट्स बंधनकारक केल्या. परंतु, महाराष्ट्रात त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच अनेक चारचाकी वाहनांवर आजही फॅन्सी नंबर्स दिसून येत असून त्याचा गैरफायदाही घेण्यात येत आहे, याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती.
दरम्यान, राज्य सरकारने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स राज्यात लागू करण्यात येत असल्याबाबत शपथपत्र दाखल करण्यात आले परंतु, अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असे अॅड. रेणू यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा नव्या नंबर प्लेट्स राज्यात कधी बंधनकारक करणार, अशी विचारणा कोर्टाने केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट