म.टा. प्रतिनिधी, नागपूर
गेल्या दोन दशकांत चीनने आपल्या पारंपरिक औषधांनी जागतिक बाजारात चांगलीच झेप घेतली आहे. त्या तुलनेत भारताच्या आयुर्वेदाचा जागतिक बाजारपेठेवरील प्रभाव फारच कमी आहे. परंतु, नव्या सरकारने यादृष्टीने पावले उचल्याचे संकेत दिसून येत आहेत. याचअंतर्गत जागतिक स्तरावर अश्वगंधा वनस्पतीच्या विविध गुणांना मान्यता मिळू लागली असून, त्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे अश्वगंधाचे उत्पादन वाढविण्याकरिता केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
आज जगातील दहा देशांमध्ये आयुर्वेदाबाबत गांभीर्याने संशोधन सुरू आहे. अर्थात त्यात भारत आणि उपखंडातील देशांचा समावेश अधिक आहे. जगभरात कुठेही आयुर्वेदाबाबत संशोधन सुरू असले तरी त्यात ८० ते ९० टक्के भारतीय वनौषधींचाच समावेश आहे. त्यावरच संशोधन बेतलेले आहे. चीनने त्यांच्या पारंपरिक औषधांवर खूप चांगले संशोधन करून ते बाजाराशीदेखील जोडले आहे. यादृष्टीने भारतही आता तयारीला लागला आहे. याबाबत केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेचे संचालक डॉ. अनिल कुमार त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चीनसोबत असलेल्या स्पर्धेवर थेट बोलणे टाळले. परंतु, ते म्हणाले, 'शतावरी आणि अश्वगंधा यांना आता जागतिक स्तरावरून मागणी येऊ लागली आहे. विशेषतः अश्वगंधाला आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळू लागली आहे तसेच भारतात याचे उत्पादन चांगले होते. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेसारख्या देशानेसुद्धा या वनस्पतीचे महत्त्व मान्य केले आहे. त्यामुळे अश्वगंधाची मागणी वाढू लागली आहे. सध्या आपण ५०० टन अश्वगंधा निर्यात करतो. परंतु आपल्याला तब्बल १५०० टन अश्वगंधाची मागणी आहे. यावरून आपल्याला बाजारपेठेचा अंदाज येऊ शकतो.'
--देशव्यापी अभियानाची सुरवात
'केंद्र सरकारतर्फे देशभरात औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीकरिता एक विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने देशभरात या वनस्पतींच्या लागवडीबाबत जनजागृती केली जाणार आहे. देशातील बरीचशी जमीन ही कोरडवाहू आहे अथवा तेथे पारंपरिक शेती केली जात नाही. अशा ठिकाणी या वनस्पतींचे उत्पादन घेणे शक्य आहे. या शेतीकरिता लागणारा पैसा पारंपरिक शेतीपेक्षा तुलनेने थोडासा कमी आहे, परंतु त्यातून मिळणारा नफा हा जास्त आहे तसेच त्याची शाश्वतीसुद्धा जास्त आहे. त्यामुळे देशात जी जमीन पारंपरिक शेतीकरिता योग्य नाही, ती जमीन या शेतीकरिता वापरण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले आहे,' अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट