म. टा. प्रतिनिधी, नागपूर
गरोदर मातांना जडणाऱ्या विविध आजारांची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने पाच समुपदेशक नेमले. संसर्गजन्य आजारांपासून ते अनुवंशिक आजारांपर्यंत वेळीच उपचार मिळावेत आणि त्या माध्यमातून गर्भातले बाळ तसेच गरोदर मातांचे प्राण वाचविले जावेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले खरे. पण, त्याला हरताळ फासण्याचा प्रकार डागा स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयात सुरू आहे. या पाचही समुपदेशकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागादेखील नसल्याने मिळेल तिथे बसून समुपदेशकांना गरोदर मातांशी संवाद साधावा लागत आहे. समुपदेशकांची सुरू असलेली ही फरफट गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
डागा स्मृती स्त्री रुग्णालय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरोदर मातांसाठी एकमेव आशेचा किरण आहे. येथे दरमहा किमान १२०० स्त्रिया बाळंत होतात. सरासरीने येथे रोज ४० बाळंतपणे होतात. याखेरीज डागा रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण विभागात रोज किमान ५०० ते ७०० रुग्ण उपचाराला येतात. मंगळवारी हा आकडा ८०० पर्यंत जातो. यात बहुतांश रुग्ण या गरोदर माता, नवजात शिशू असतात. गरोदर मातांना बाळंतपणापूर्वी काही संसर्गजन्य आजार बळावण्याचा धोका असतो. शारीरिक संबंधातून हे आजार एकमेकांकडून पसरतात. याशिवाय, जोडप्यातल्या एकालाही रक्ताशी निगडित सिकलसेल, थॅलेसेमिया, एचआयव्ही एड्ससारखे आजार असतील तर मातेच्या गर्भात वाढणारा जीव हा आजार घेऊन जन्माला येण्याची जोखीम असते. त्यामुळे डागा रुग्णालयातल्या गरोदर मातांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शरीरसबंधातून निर्माण होणाऱ्या आजारांवर समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक पद निर्माण केले. याशिवाय नवजात शिशूंनाही काही आजार संसर्गजन्य बळावण्याचा धोका असतो.
या आजारांची लक्षणे वेळीच निदर्शनास आली तर गर्भातला जीव आणि मातेचे प्राण वाचविता येणे शक्य असते. ही गरज लक्षात घेता सरकारने पाच समुपदेशक डागाला उपलब्ध करून दिले. जेणेकरून, या समुपदेशकांनी गरोदर मातांशी संवाद साधून आजाराची लक्षणे नोंदवून घ्यावी आणि त्या दृष्टीने उपचार सुरू करावा, हा त्या मागचा उद्देश होता. त्यासाठी वास्तविक स्थानिक प्रशासनाने पाचही समुपदेशकांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देणे गरजेचे होते. वास्तविक अशी कोणतीही सोय न केल्याने या समुपदेशकांची जागेअभावी फरफट सुरू आहे.
जिथे जागा मिळेल तिथे बसून या समुपदेशकांना गरोदर मातांशी संवाद साधावा लागत आहे. त्यामुळे गरोदर माता आपल्याला जडलेल्या आजारांविषयी बोलण्यास संकोच करीत असल्याने सरकारच्या मूळ उद्देशालाच खीळ बसत आहे.
दरम्यान, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणूनही समुपदेशकाकडे पाहिले जाते. या समुपदेशकांची अशी फरफट थांबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट