म. टा. प्रतिनिधी, नागपूर
परराज्यासह बाहेरगावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ इशान्य नागपूरतर्फे सुपर स्पेशालिटीत नियोजित प्रतीक्षालयाला अखेर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. अंदाजे २७ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रतीक्षालयात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, तीन स्वच्छतागृहे, आंघोळीसाठी दोन बाथरूम रोटरी क्लब बांधून देणार आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
सुपरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांंसह विदर्भाच्या ग्रामीण भागातून रोज किमान २ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. उपचारादम्यान बाहेर वास्तव्य करणे नातेवाईकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारातच पसारी मारून असतात. रुग्णांची होणारी ही हेळसांड लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ इशान्य सुपरला प्रतीक्षालय बांधून देणार होते. त्यासाठीचा प्रस्तावही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पाठविण्यात आला होता.
मात्र, विभागाने उदासीनता दाखविली. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून ही फाइल मंत्रालयात नुसती फिरत होती. रुग्णहिताशी निगडित प्रतीक्षालय मात्र थंडबस्त्यात पडले होते. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्याची सोयदेखील नाही. त्यामुळे ही व्यवस्थाही रोटरी क्लब देणार होते.
पाऊसपाण्यात रुग्णांच्या नातेवाइकांची यातून सोय होईल, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा सर्व खर्च रोटरी क्लब करणार होते. सरकारवर त्यापोटी एका पैशाचादेखील बोजा पडणार नव्हता. रोटरी क्लबने दिलेला हा प्रस्ताव सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने २४ जानेवारी २०१६ ला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांकडे पाठविला होता. त्यात विभागाने तब्बल पाचवेळा काही दुरुस्त्या सुचविल्या. सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या दुरुस्त्या करून सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे वेळोवेळी सादरही केला. मात्र, मंत्रालयातील बाबुगिरीमुळे हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले यांनीदेखील मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पत्रालाही मंत्रालयातल्या काही बाबूंनी कचऱ्याची पेटी दाखविली.
--आता तरी वाचतील हाल
विभागातल्या काही अाडमुठ्या अधिकाऱ्यांमुळे रुग्णांची होणारी हेळसांड पुन्हा चव्हाट्यावर आली. ऐन पावसाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना इतरत्र आधार शोधावा लागत असल्याची बाब प्रकाशात आल्यानंतर भानावर आलेल्या विभागाने आता कुठे या फाइलला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता निदान पुढच्या मोसमात तरी रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल थांबतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट