'वनविभागाच्या अनेक कठोर कायद्यांनी आदिवासी क्षेत्रात विकास कामे करण्यात अडचणी निर्माण होतात. आदिवासींना अडचणींचा सामना करावा लागतो यामागे अनेक कायद्यांचा अडसर हेदेखील एक कारण आहे. पर्यावरण रक्षणाचे काम महत्त्वाचे आहेच. मात्र, माणसेदेखील जगली पाहिजेत. कायदा कोणाकरिता आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन आणि माणसांचे हित यामध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मेळघाटात आदिवासींकरिता आपले संपूर्ण आयुष्य देणारे डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना शनिवारी डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी आदिवासींच्या विकासासाठी धोपटमार्गापलीकडे जाऊन विविध प्रयोग केले जावेत, असे मत वक्त केले. सत्यनारायण नुवाल व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने हा कार्यक्रम शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुळकर्णी, गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी, सी. मो. झाडे फाउंडेशनचे विकास झाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोल्हेंसारख्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाल्याने इतरांनाही काम करण्याची प्रेरणा मिळते. विदर्भातील संतांचे अध्यात्म केवळ पोथ्यांमध्ये बंिदस्त राहिलेले नाही. खरे अध्यात्म हे सेवेतच असल्याचे या संतांनी सांगितले. सर्व प्राण्यांमध्ये सेवेची भावना मनुष्यालाच प्राप्त झाली आहे. त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. दारूबंदीपासून दारूमुक्तीपर्यंतचा प्रवास हा समाजाच्या पुढाकारानेच होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी आपल्या मेळघाटच्या वास्तव्यातील आठवणी याप्रसंगी सांगितल्या. मेळघाटातील अनेक गावे मोबाइल नेटवर्कने जोडलेली नाहीत आणि त्यामुळे राष्ट्रीय रुग्णवाहिका नेटवर्कचा वापर तेथील आदिवासींना होत नाही. अद्यापही सर्व गावांना वीजपुरवठा मिळत नाही, असे डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले. कृपाल तुमाने आणि रूपा कुळकर्णी यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना यावेळी गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक विकास झाडे, संचालन स्वाती हुद्दार यांनी केले. उपस्थितांमध्ये डॉ. गिरीश गांधी, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट