वृद्ध, अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकावर असलेली बॅटरी कारची सुविधा रेल्वे प्रशासनाने २६ एप्रिलपासून सुरक्षेच्या कारणावरून बंद केली होती. मात्र, या विरोधात शहर महिला काँग्रेसने स्थानकावर आंदोलन केल्यानंतर विभागीय व्यवस्थापकांनी समिती नेमली व या समितीच्या शिफारशीनुसार बॅटरी कार पुन्हा सुरू केली. समितीच्या शिफारशीवरील चर्चेसाठी झालेल्या बैठकीत भारवाहक संघाचे अध्यक्ष मजीद यांनी बॅटरी कारचा विरोध केला होता. आधीच ट्रॉली बॅगमुळे आमचा व्यवसाय अर्ध्यावर आला आहे, आता बॅटरी कारमुळे कुलींसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मजीद यांचे म्हणणे होते. दरम्यान, प्रशासनाने ही बॅटरी कार सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी मजीद यांनी या कारमधून प्रवाशांसहच त्यांचे सामान नेण्याला विरोध केला. ते म्हणाले की, वृद्ध, अपंग, रुग्ण प्रवाशांनी बॅटरी कारने जायला आमचा विरोध नाही, मात्र त्यांचे सामान या कारमधून नेऊ नये. असेच होत असेल तर कुलींनी पोट कसे भरायचे, असा त्यांचा प्रश्न होता. बॅटरी कारमधून सामानाची वाहतूक करण्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी आपण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट