सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जोपर्यंत अंमलबजावणी यंत्रणा समजून घेत नाही, तोपर्यंत योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी केले.
नागपूर शहर पत्रकार संघ, जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर, बहुजन साहित्य प्रचार केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मीडिया फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविभवन येथील सभागृहात आयोजित सामाजिक न्याय विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रारंभी माहिती संचालक मोहन राठोड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त माधव झोड, प्रा. मुकुंद मेश्राम, डी. एम. गोस्वामी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, नरेश मेश्राम, भागवत लांडगे, सुजित मुरमाडे, आर. एस. अंबुलकर उपस्थित होते. खोब्रागडे पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबवित असून योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे व योग्यरीत्या झाल्यास मागासवर्गीयांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळू शकतो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश एकच होता. समाजातील गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. या दोघांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाची निर्मिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शिक्षण व इतर योजनांवर भर देण्याची गरज असून त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंचित घटकांना न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असे राठोड यांनी सांगितले.
विभागात ७० वसतिगृहे
सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असून नागपूर विभागात ७० शासकीय वसतिगृह असून त्यात १४ वसतिगृह मुलींची आहेत, अशी माहिती झोड यांनी दिली. प्रास्ताविक नरेश मेश्राम यांनी केले. आभार भागवत लांडगे यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट