आदिवासी भागातील असतानाही 'आमची शाळा' जिल्ह्यात पहिली आली. गावाशेजारची दुसरी शाळाही राज्यातील पहिली डिजीटल शाळा ठरली. असे असतानाही मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधायचा असताना आमचा हक्क हिरावण्यात आला. आता शाळेतील शिक्षकच कमी करून टाकले आहेत. आम्ही पुढे जात आहोत याचाच कदाचित राग असावा... सभापती साहेब काहीही करा पण, आमच्या भागात मास्तर धाडा. आम्हालाही शिक्षित होऊन द्या, अशी आर्त हाक मेहताखेडासह देवरी तालुक्यातील ककोडी-मिसिर्पिर्री केंद्रातील आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाला केला आहे.
'गावची शाळा, आमची शाळा' या प्रकल्पांतर्गत देवरी तालुक्याच्या आदिवासी भागातील मेहताखेडा ही शाळा जिल्ह्यात प्रथम आली. अतिदुर्गम भागातील जेठभावडाची शाळा कम्प्युटरवर विद्यार्थ्यांना धडे देणारी राज्यातील पहिली डिजीटल शाळा ठरली. देवरी, सालेकसा यासारख्या आदिवासी, माओवादग्रस्त आणि अतिदुर्गम भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही आदिवासींची मुले शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत. या भागात कॉन्व्हेंट प्रथा नसतानाही येथील विद्यार्थी शहरींपेक्षा सरस ठरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना अधिक वाद देत त्यांचा विकास साधणे आवश्यक आहे. पण, आपसी राजकारण करण्यासाठी शिक्षकांच्या बदली प्रकरणात घोळ करण्यात आला. यावरून आवाज उठविण्यात आल्यानंतर बदल्या रद्द झाल्या. पण, देवरी-सालेकसा तालुक्यातील बदलीसाठी आस लावून बसलेले शिक्षक तातडीने नव्या ठिकाणी रूजू झाले. तर या भागात नियुक्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला हाताशी धरून नव्या ठिकाणी रूजू होण्याचे टाळले. त्यामुळे या आदिवासी भागातील शिक्षकांची संख्या घटली आहे. मेहताखेडा शाळेची पूर्णत: वाताहत झाली आहे.
वर्ग सात, शिक्षक दोन
मेहताखेडा येथील सात वर्ग आहेत. त्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. मुख्याध्यापकही तेच आणि टपाल नेणारेही. शालेय पोषण आहार, सरल-प्रगतची कामेही हेच शिक्षक करतात. निवडणूक आल्यास याद्याही हेच तयार करतात. मग विद्यार्थ्यांना शिकविणार कोण, असा सवाल आदिवासी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे. शिक्षण विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. याच योजनेंतर्गत या आदिवासी भागाला शिक्षक मिळणार आहेत. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यानंतर सर्व शिक्षण प्रक्रिया नियमित होणार.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट