भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक अशा चार राज्यांपुरताच केंद्राचा कारभार मर्यादित होता. मध्यप्रदेश राज्याचे विभाजन झाल्यानंतर त्यातून बाहेर पडलेले छत्तीसगढ राज्य केंद्रात समाविष्ट करण्यात आले. बरीच वर्षे या पाच राज्यांतील सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र दक्षिण मध्यच राहिले. आंध्रप्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणची निर्मिती झाली. मागील वर्षी तेलंगणदेखील दक्षिण मध्य केंद्रात समाविष्ट झाल्यामुळे राज्यांची संख्या सहा झाली होती. आता नैसर्गिक संपदा आणि समुद्र किनाऱ्याने नटलेल्या गोवा राज्याचाही केंद्रात समावेश करण्यात आला आहे.
डॉ. पीयूषकुमार यांनी संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केंद्राचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजत आहे. एक वर्षाच्या कालावधीत दोन राज्यांनी दक्षिण मध्य क्षेत्रीय केंद्रात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली, ही केंद्राची मोठीच उपलब्धी मानली जात आहे.
डॉ. पीयूषकुमार म्हणाले,'अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्याची संस्कृती भिन्न आहे. विदेशी शासनकर्त्यांचा प्रभाव असलेली या राज्यातील कला, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य आहे. भविष्यात मध्य दक्षिण केंद्र गोव्यात आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन तर करू शकेलच शिवाय, तेथील सांस्कृतिक घडामोडींशी केंद्र जोडले जाणार असून, इतर राज्यात त्यांच्या कला प्रदर्शित केल्या जाऊ शकतील.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट