'फिटनेस' ही संकल्पना आता प्रत्येकाच्याच अंगवळणी पडू लागली आहे. अर्थात तो करायचा कसा, याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे 'फंडे' आहे. शहरातील वाढती संख्या बघता व व्यायामाबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी 'नागपूर फिटनेस मुव्हमेंट' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध उद्यानांमध्ये ७९ ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
'ग्रीन जीम' ऐकून जरा नवल वाटेल. मात्र, ही आगळीवेगळी संकल्पना नागपूरचे खासदार अविनाश पांडे यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे. याअंतर्गत उद्यानांमध्ये नियमितपणे सकाळचा व्यायाम करणाऱ्यांकरिता खुल्या आकाशाखाली खास उद्यानात व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आबालवृद्धांकरिता स्काय वॉकर, लेग प्रेस, एअर वॉकर शेवर, चेस्ट प्रेस, सर्फ बोर्ड, सीट अप बोर्ड, सिटिंग आणि स्टॅण्डिंग ट्विस्टर आदी साधनांचा यात समावेश आहे. पांडे यांनी खासदार निधीतून हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीकडे शहरातील ७९ उद्याने व क्रीडांगणांमध्ये ग्रीन जिम राबविण्याची जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी माजी खासदार दिवंगत श्रीकांत जिचकार यांच्या पुढाकाराने 'नागपूर फिटनेस मुव्हमेंट' अंतर्गत वजन कमी करण्याचे अभियान राबवण्यात आले होते. याच अभियानाला पुढे नेत आता 'ग्रीन जिम'चा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे खासदार अविनाश पांडे यांनी स्पष्ट केले. यासाठी पांडे त्यांच्या खासदार निधीतून ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या उपक्रमाची उद्यानांमध्ये योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी नागपूर महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागपूरकर अधिक 'फिट' दिसतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट