केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे गेल्यावर्षी नागपुरातून युनिव्हर्सल अॅक्सेस टू ट्यूबरो क्युलोसिस केअर या पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. त्यापार्श्वभूमीवर 'मटा'शी साधलेल्या खास संवादात डॉ. कांबळे म्हणाले, 'एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी १ लाख २० हजार नव्या टीबी रुग्णांची भर पडते. मल्टी ड्रग रजिस्टन्सीमध्ये (एमडीआरटीबी) मृत्यूचे प्रमाण १५ टक्के आहे. देशाची सरासरी काढली तर दरवर्षी टीबीचे १८ लाख रुग्ण नव्याने उपचार घेतात. त्यापैकी ३ लाख ५० हजार जणांचे वेळीच निदान न झाल्याने निधन होते.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात १४५२ सूक्ष्म निदान केंद्र चालविले जातात. ज्या मायक्रोस्कोपच्या खाली सूक्ष्म निरीक्षण होते त्यातून केवळ ४० ते ४५ टक्के रुग्ण सापडतात. त्यातही या रुग्णांनी प्रदीर्घ उपचारात खंड पडला तर शरीरात वाढणाऱ्या क्षयरोगाच्या जंतूंची प्रतिकारक्षमताही वाढायची. मात्र, या नव्या सीबी नॅटमुळे आता थेट मानवी गुणसूत्राची रचना तपासून क्षयरोगाचे अचूक निदान शक्य आहे. एका सीबी नॅटसाठी २५ लाख रुपये खर्च येतो. शिवाय अवघ्या १६०० रुपयांत चाचणी केल्यानंतर दोन तासांत निदान होते. त्यामुळे उपचाराची दिशा ठरवून औषधांना न जुमानणाऱ्या टीबीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. एकट्या मुंबईत ३५०० रुग्ण एमडीआर तर २५० रुग्ण एचबीआर उपचार घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही आकडेवारी कर्करोगाइतकीच घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट