नागरिकांची पायपीट थांबावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या समाधान शिबिरांतर्गत 'शासन आपल्या दारी' या उपक्रमात एकाच छताखाली नागरिकांची कामे होऊ लागली आहेत. गेल्या दोन दिवसांत १६०० जणांची कामे झाले असून १२ ऑगस्टपर्यंत ७ हजार नागरिकांना समाधान प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदीप जोशी यांनी सांगितले.
छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना पायपीट करावी लागू नये. कामे लवकर करण्य़ासाठी अधिकाऱ्यांच्या हातावर चिरीमिरी देण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिराची संकल्पना मांडली. शासन आपल्या दारी ही संकल्पना मांडून सुरू झालेल्या या उपक्रमाला ९ ऑगस्टपासून सुरुवात झाली. सुरुवातीला लक्ष्मीनगर झोनसाठी हा उपक्रम घेण्यात येत असून १२ ऑगस्टपर्यंत दीक्षाभूमीजवळील वैधानिक विकास महामंडळ येथे एकाच छताखाली ४० विभागांची कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ही प्रमाणपत्रे झाली उपलब्ध
उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, एन.टी., विशेष मागासवर्गीय, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, मतदारयादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळणे, मतदारयादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाची दुरुस्ती, मतदारयादीतील नोंदीचे स्थानांतर करणे, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका, विवाह प्रमाणफत्र, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र देण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लवकरच इतर झोनमध्ये शिबिर
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ७ प्रभागांना या शिबिराचा लाभ होत आहे. आरपीटीएस, साई मंदिर, नरेंद्रनगर, खामला, गोपालनगर, टाकळीसीम विमाननगर भागातील नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत. लवकरच इतर झोनमध्ये शिबिरे घेण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन निलिमा बावणे, गोपाळ बोहरे, गिरीश देशमुख, जयश्री वाडीभस्मे, उषा निशितकर यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट