सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित होणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवांतर्गत घेण्यात येणाऱ्या मराठी, हिंदी हौशी नाट्यस्पर्धा, व्यावसायिक, संस्कृत संगीत, बालनाट्य स्पर्धांच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच, सहभागी संस्थांना देण्यात येणाऱ्या नाट्य निर्मिती खर्चात वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारने मार्च २०१६ मध्ये केली होती. सरकारच्या या निर्णयाचे रंगकर्मींकडून जोरदार स्वागतही करण्यात आले होते. पण, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. २५ वर्षांपासून राज्य सरकारकडून नाट्यनिर्मितीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये प्रत्येक संस्थेला दिले जातात. या २५ वर्षांत नेपथ्य, ध्वनिव्यवस्था, लाइट्स, प्रवास खर्च आदींमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. हौशी कलाकार अनेक तडजोडी करून स्पर्धांमध्ये नाटक सादर करत असतात. सरकारचा हा भत्ता व पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे नाट्यसंस्थांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर तोडगा म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पारितोषिकाची रक्कम व भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 'सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी भत्त्यांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर २७ मार्च रोजी बैठकही बोलावली होती. पण, रकमेत वाढ करायची तर स्पर्धेचे काही नियमही बदलावे लागतील. पुढील वर्षीच्या नाट्य स्पर्धांत रंगकर्मींना वाढीव भत्त्यांचा नक्की लाभ घेता येईल', असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट