खोटे विक्रीपत्र सादर करून राज्य ग्राहक मंचात दाद मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर भादंविच्या कलम ४६७ आणि ४७१ अन्वये गुन्हे दाखल करा, असे आदेश प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. शर्मा यांनी दिले आहेत. अरविंद नेने असे या व्यक्तीचे नाव असून सोनेगाव पोलिसांना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
अरविंद नेने यांनी शहरातील बिल्डर अमित देशपांडे यांच्याविरुद्ध राज्य ग्राहक मंचात २०१२मध्ये तक्रार केली होती. मौजा सोमलवाडा मनीषनगर, येथील साक्षी स्प्रिंक्स येथे गाळा क्रमांक १०१ आणि ३०३ हे आपल्या मालकीचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. या गाळ्यांकरिता आपण विक्रीपत्र केले असून त्याकरिता आपण ४७ लाख रुपये नगदी अमानत रक्कम व उर्वरित ३५ लाख रुपयांची रक्कम नंतर देतो, असे सांगितल्याचा दावा केला होता. अरविंद नेने यांनी एकाच स्टॅम्प पेपरवर या गाळ्यांचा करारनामा आणि विक्रीपत्र दाखविले होते. परंतु, या विक्रीपत्राचे मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा नेने देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळून लावण्यात आली होती, अशी माहिती अमित देशपांडे यांनी दिली आहे.
यानंतर देशपांडे यांनी या प्रकरणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेसुद्धा नेने यांना दोषी ठरवित त्यांच्यावर भादंविच्या कलम ४६७ आणि ४७१ अन्वये गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले आहेत. ३ ऑगस्ट रोजी हे आदेश देण्यात आले. त्यानंतर देशपांडे यांनी या आदेशांची प्रत सोनेगाव पोलिसांत दाखल केली. परंतु, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नेने यांचे सोनेगाव पोलिसांशी साटेलोटे असल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट