म. टा. प्रतिनिधी, नागपूर पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि दर्जेदार उपचारांमुळे लंडनमध्ये भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. इंग्लंडच्या राणीपासून ते सर्वसामान्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात समान उपचार दर्जा मिळतो. 'शिका, कमवा आणि परत करा' या त्रिसूत्रींच्या आधारावर तेथील डॉक्टरांचेही पारदर्शकपणे ऑडिट केले जाते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करून इच्छिणाऱ्यांसाठी लंडनमध्ये संधीची दारे सताड उघडी आहेत, असा सूर नागपूरकर असलेले आणि गेल्या १८ वर्षांपासून लंडन येथे सेवा देत असलेले डॉ. दीपक हर्लेकर यांनी येथे व्यक्त केला. लंडनच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेल्या डॉक्टरांच्या नेमणूक समितीवर प्रमुख असलेले डॉ. हेर्लेकर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी विद्यार्थी आहेत. मेडिकलमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावी डॉक्टरांसाठी गुरुवारी आयोजित 'हिप जॉइंट रिप्लेसमेंट'वर थेट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नागपुरात आले असता माध्यमांशी साधलेल्या संवादात डॉ. हेर्लेकर यांनी लंडन आणि भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या फरकावर प्रकाश टाकला. लंडनध्ये आरोग्य सेवा देत असलेल्या प्रत्येक डॉक्टरचेही ऑडिट करणारी प्राधिकरण यंत्रणा कार्यरत असल्याचे नमूद करीत डॉ. हेर्लेकर म्हणाले, लंडनच्या राजघराण्यातील व्यक्तीसाठी उपचारांचा जो दर्जा दिला जातो, तोच सर्वसामान्य मजुरालादेखील मिळतो. तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत देशाच्या प्रत्येक नागरिकाला मोफत उपचार मिळतो. रुग्णहिताला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना समान एक देश एक उपचारपद्धतीच्या आधारावर ही व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपासून ते खासगीत आरोग्यसेवा देत असलेल्या प्रत्येक डॉक्टरवर प्राधिकरणाचा वॉच असतो. त्यामुळे डॉक्टरलादेखील परवान्याचे नूतनीकरण करताना रुग्णावर केलेल्या उपचारांची माहिती संगणकावर अपडेट ठेवावी लागते. ही माहिती कोणताही व्यक्ती पाहू शकतो, त्यामुळे डॉक्टरच्या सेवेचेही पारदर्शीपणे ऑडिट होते. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्यांना अस्थिरोगाशी निगडीत अद्ययावत तंत्राचे ज्ञान व्हावे, यासाठी लर्न, अर्न अँड रिटर्न या त्रिसूत्रीनुसार प्रात्यक्षिकांवर आधारित तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मेडिकलमध्ये पायाभूत सुविधांपासून ते शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याने येथील भावी अस्थिरोगतज्ज्ञांनादेखील ही संधी मिळू शकते. त्यासाठी लंडन येथील यंत्रणेकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, अशी हमीदेखील त्यांनी यावेळी दिली. सिकलसेलग्रस्तांची होईल सोय लंडनमधील अद्ययावत तंत्र आणि विदर्भातील रुग्णांची सांगड घालता आली तर येथील गरिबांपर्यंतही दर्जेदार उपचार पाझरतील असे नमूद करीत विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा म्हणाले, विदर्भात सिकलसेलग्रस्तांची संख्या मोठी आहे. प्रदीर्घ उपचार घ्यावे लागणाऱ्या अशा रुग्णांना हिप जॉइंट रिप्लेसमेंटची गरज भासते. त्यामुळे या संधीचा सिकलसेलग्रस्तांना लाभ होईल, असेही ते म्हणाले. ..............
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट