म. टा. प्रतिनिधी, नागपूर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुभाष मार्गावरील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते उद्घाटन होईल तर माजी मंत्री विलास मुत्तेमवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी महापौर विकास ठाकरे तसेच इतर मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर प्रा. प्रशांत ठाकरे यांचे 'राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म व कार्य' या विषयावर व्याख्यान होईल. या महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, आमदार विकास कुंभारे तसेच इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमांनंतर डॉ. संगीता टेकाडे यांचा राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर एकपात्री प्रयोग सादर होईल. याशिवाय, सामुदायिक ध्यान आणि चिंतन, राष्ट्रवंदना तसेच मध्यवर्ती बसस्थानक येथे स्वच्छता अभियान असे कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड. अशोक यावले, उपाध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव अॅड. सुरेश राजूरकर तसेच इतरांनी केले आहे. .............................
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट