-डांगोर्लीतील वैनगंगा नदीपात्रात महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई म.टा. वृत्तसेवा, गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झालेले नसतानाही गोंदिया तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खन्नन करीत त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत डांगोर्लेी येथील नदीघाटावरून साडेसात लाखांवरील मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैधसाठा करणाèऱ्या लखन बहेलियासह ट्रॅक्टर चालक व मालकांविरुद्ध रावणवाडी पोलिसांत मंडळ अधिकारी यांनी गुरुवारी लेखी तक्रार नोंदविली. जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईसाठी सयुंक्तपणे केलेली ही पहिलीच कारवाई आहे. अवैध रेती वाहतूक करणारे हे जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाशी जवळीक साधणारे असल्याचे बोलले जात आहे. गोंदिया तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास रावणवाडी पोलिस ठाणेंतर्गतच्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीपात्रातून काही इसम रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे गस्तीवर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईकरिता गेले असताना चारपैकी एक ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून भरलेल्या रेतीसह पसार झाला. तर तीन ट्रॅक्टरचालक हे ट्रालीसह घटनास्थळवरच असल्याने चालक व मालकांचे बयाण नोंदविण्यात आले. घटनास्थळावरून दोन मोटारसायकल सुद्धा हस्तगत करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान तीन ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले असून रेतीसह जप्त मुद्देमालाची रक्कम ७ लाख ५६ हजार रुपये आहे. नोंदवहीत आढळलेल्या नोंदीप्रमाणे अवैधरित्या रेतीचा साठा केल्याप्रकरणी लखन बहेलिया यांच्यासह ट्रॅक्टरचालक व मालकाविरुद्ध रावणवाडी पोलिसांत मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी यांनी लेखी तक्रार नोंदविली आहे. गोंदियाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, तहसिलदार राहुल सारंग, रावणवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, मंडळ अधिकारी तिवारी, तलाठी देवेंद्र भगत, धन्नुलाल मडावी, बिहारीलाल बिसेन, अमित बडोले, अव्वल कारकून आशिष रामटेके, पोलिस शिपाई उमाळे, नंदेश्वर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट