राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी 'अखंड भारत संकल्प दिना'च्या कार्यक्रमांवर भर दिला आहे. आतापर्यंत कार्यक्रम व्हायचे पण, त्याचा फारसा वाजागाजा होत नव्हता. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ७०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपसह परिवारातील अनेक संघटनांनी सप्ताहभर कार्यक्रम आयोजित केले. त्यात काही संघटनांनी अखंड भारतला नव्याने ऊर्जा दिली आहे.
हिंदू महासभेच्यावतीने अखंड भारतचे कार्यक्रम दरवर्षी व्हायचे. मात्र, या कार्यक्रमास मोजके कार्यकर्ते उपस्थित असायचे. यावेळी परिवारातील संघटनांनी त्यास व्यापक स्वरूप दिले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने शुक्रवारी धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये अखंड भारत दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अजय निलदावार आणि प्राचार्य अखिलेख पेशवे यांनी ऐतिहासिक दाखले देत अखंड भारत व देशभक्तीचे महत्त्व पटवून दिले. मातृभूमी प्रतिष्ठानने शनिवारी सकाळी अखंड भारत संकल्प दिन कार्यक्रम आयोजित करून वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मणिंदरसिंह बिट्टा प्रामुख्याने उपस्थित होते. संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम् आयोजित करण्यात आले.
युवा आयामच्यावतीने रविवार, १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संयोजक इंद्रेशकुमार यांचे सायंकाळी ५.३० वाजता रेशीमबागेत व्याख्यान होईल. युवाचे संयोजक पंकज कोठारी यांनी या कार्यक्रमाशी संघाचा संबंध असल्याचा इन्कार केला. तरुणांना अखंड भारत व इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. युवाचे कार्यकर्ते संघाशी संबंधित असून पहिल्यांदाच संघाच्या परिसराचा वापर होत असल्याचा दावा संघाशी संबंधित सूत्रांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट