आवाजाच्या वेगाने मारा करणारे जगातील सर्वात जलद क्षेपणास्त्र ब्रह्मोसला लढाऊ विमानासाठी सज्ज केले जात आहे. पण, आता हेच ब्रह्मोस छोट्या विमानाने डागता यावे, यासाठी खास 'मिनी ब्रह्मोस' तयार केले जात आहे. विशेष म्हणजे, याचे संशोधन नागपुरात सुरू आहे.
'ब्रह्मोस' हे सुपरसॉनिक अर्थात आवाजाच्या वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र डीआरडीओअंतर्गत रशियाच्यासोबत संयुक्तपणे विकसित केले जात आहे. अशाप्रकारचे क्षेपणास्त्र जगातील मोजक्याच देशांकडे आहे. त्यात भारताचा समावेश आहे. पण त्याहीपेक्षा हे या श्रेणीतील सर्वाधिक जलद वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्यात लढाऊ विमानाद्वारे ते डागण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. त्याची बांधणीदेखील नागपुरात होत आहे. तसे असताना आता याच श्रेणीत नागपूरच्या ब्रह्मोस केंद्राकडून आणखी एक महत्त्वाचे संशोधन सुरू झाले आहे.
मूळ ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे २.८ टन (२८०० किलो) वजनाचे आहे. सुखोई विमानाने ते डागण्यासाठी त्याची लांबी करून वजन २.५ टन करण्यात आले आहे. पण भविष्यात या क्षेपणास्त्राची गरज वाढणार आहे. अशावेळी केवळ सुखोईच नाही तर अन्य विमानांनीदेखील ते डागता यावे, याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मिनी ब्रह्मोसचे संशोधन सुरू झाले आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यालाच 'नेक्स्ट जनरेशन' असे नाव देण्यात आले आहे. 'विमानाने डागता येणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी अद्याप सुखोईशिवाय अन्य कुठल्याही विमानांचा विचार झालेला नाही. परंतु छोट्या विमानांनी ते डागता येईल का? याचा विचार सुरू झाला आहे. यासाठी २.८ ते २.५ टनापेक्षा हलके अर्थात १.५ टन वजनाचे असे छोटे क्षेपणास्त्र आम्ही विकसित करीत आहेत. नागपूरच्या केंद्रातच हे संशोधन सुरू आहे. पण अशाप्रकारच्या क्षेपणास्त्राची नेमकी मागणी कुणाहीकडून अद्याप आलेली नाही. केवळ संशोधन सुरू आहे', असे येथील ब्रह्मोसच्या केंद्राचे महाव्यवस्थापक मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी 'मटा' ला सांगितले.
भविष्य 'हायपरसॉनिक'चे!
हवेत सर्वाधिक वेग प्रकाशानंतर आवाजाचा असतो. यासाठीच ब्रह्मोस हे त्या वेगाने मारा करणारे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित झाले. त्या श्रेणीत भारत देशात अव्वल असला तरी आता भविष्यकाळ 'हायपरसॉनिक'चा आहे. आवाजाच्या वेगाहून अधिक वेगाने मारा करता येणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्याबाबतही महत्त्वाचे संशोधन ब्रह्मोसच्या नागपूर केंद्राने सुरू केले आहे. 'ब्रह्मोस २' नावाचे हे क्षेपणास्त्र सध्या केवळ डिझाइन स्तरावर आहे. पण २०१९ नंतर ते आकारास येईल, असे मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट