जिल्ह्यात होणाऱ्या अवैध वाळू उत्खननावर आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर उडविण्यात येत असलेल्या ड्रोन विमानाची धास्ती वाळूमाफियांनी घेतलेली दिसते. आतापर्यंत २३ तासांपेक्षा अधिक काळ ड्रोन विमानाचे उड्डाण करूनही या कॅमेऱ्यात केवळ तीनच ट्रक सापडले.
बांधकाम क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या रेतीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो. दंडात्मक, फौजदारी कारवायांची तरतूद असूनही हा काळाबाजार रोखण्यात प्रशासनाला पूर्णता यश आले नाही. प्रथमच राज्यात स्मॅट्स (SMATS) या प्रणालीचा वापर करूनही अवैध गौण खनिज उत्खनन थांबले नाही. त्यामुळे वाळूमाफियांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी 'ड्रोन' विमानांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रोयोगिक तत्त्वावर नागपुरात 'ड्रोन' विमान उडवून रेतीमाफियांना प्रतिबंध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ड्रोनचे वेळापत्रक जाहीर न करता अचानक ड्रोन उडविण्यात येत आहे. २५ एप्रिलपासून ड्रोन विमानाचे उड्डाण करण्यात येत आहे. आतापर्यंत २३ तासांपेक्षा अधिक ड्रोन उडविण्यात आले.
धोकादायक विशेष मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या मनुष्यविरहित ड्रोन विमानाच्या मदतीने आता वाळूमाफियांवर लगाम घालण्यात येत आहे. ड्रोनने घेतलेले अपडेट्स तालुकास्तरीय अधिकाऱ्यांपासून ते जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना प्राप्त होऊ लागले आहेत. लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. ....
असे झाले उड्डाण
२५ एप्रिल रोजी पारशिवनी, सावनेर, कामठी तालुक्यात ३० एप्रिलला सावनेर, २ मे रोजी सावनेर, ४ मे रोजी कामठी, ५ मे रोजी मौदा तालुक्यात ड्रोन उडविण्यात आले. ४ मेपर्यंत एकही अवैध वाळूचे उत्खनन किंवा वाहतूक ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली नाही. ६ मे रोजी मौदा तालुक्यात वाकेश्वर घाटाजवळ तीन ट्रक आढळून आले. कॅमेऱ्यात कैद झालेली माहिती त्वरित प्रशासनाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींचा समावेश असलेल्या पथकाने हे ट्रक ताब्यात घेत कारवाई केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट