म.टा. प्रतिनिधी, वाशीम हाजी मस्तानशाह संदल दरम्यान दोन गटात झालेल्या वादात दगडफेक होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झालेत. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी ५७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर त्यापैकी ४३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काल झालेल्या वादात तरुणावर चाकू हल्ला झाल्याने गावात तणावाची परिस्थिती होती. वादाचे पडसाद म्हणून गुरुवारी बाजारपेठ कडकडीत बंद होती.
येथील मस्तानशाह बाबा यांची संदल मिरवणूक ११ मे रोजी सायंकाळी काढण्यात आली. संदल रात्री साडेसातच्या दरम्यान गांधी चौकाजवळ आल्यानंतर दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक भोरडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहम्मद खालिक, संजय श्रृंगारे, पोकाँ राधेश्याम महल्ले, किशोर मराठे, बालाजी रगडे आदी पोलिस कर्मचारी जखमी झालेत. यावेळी जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली. तसेच याचवेळी चिंतामन डांगे या तरुणावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेचे पडसाद गुरुवारी उमटले. बाजारपेठ दिवसभर बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचा उपाय म्हणून गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल माजविणाऱ्यांविरूद्ध पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी व्यापक मोहीम राबवित असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट