नागभीडपासून सुमारे २५ किमी अंतरावर असणाऱ्या वनविकास महामंडळाच्या बाळापूर वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळलेली वाघीण ही परिसरातील तीन बछड्यांचीच माता असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वनविभागाचे बछड्यांसाठी सर्च ऑपरेशन जारी असून यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. दरम्यान दीडशेहून जास्त जण या शोध मोहिमेत गुंतले आहे.
नागभीड तालुक्यातील बाळापूर वनविकास महामंडळाच्या सावंगी फाटा जवळील कक्ष क्रमांक ७३ मधील जंगलात रविवारी मृत वाघीण आढळली. मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता अशी माहिती होती. आता तीन बछड्यांची माता ही तीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे सात महिन्यांची तिचे बछडे असून ते मंगळवारी एका स्थानिकला दिसले. ती लहान असल्याने आईवरच अवलंबून असून त्यामुळे वाघिणीच्या मृत्यूने त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. बछड्यांसाठी सर्च ऑपरेशन जारी असून युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे . त्यासाठी परिसरात पन्नास कॅमेरे लागले असून. दीडशेहून जास्त जण या शोध मोहिमेत आहेत. बुधवारी बछड्यांचे पगमार्क आढळले. पण त्यांचा शोध लागला नाही. घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी पी. एस. राजपूत यांच्यासह वनाधिकारी, व कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉग स्कॉड देखील या शोध मोहिमेत गुंतला असून बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२ मध्ये ते बछडे असल्याचे पुराव्यावरून समोर येत आहे. त्यास गुरुवारपर्यंत यश येण्याचा विश्वास मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट