सिकलसेल या रक्ताशी निगडित आजाराचा प्रसार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. याला आळा घालण्यासाठी विवाहापूर्वी रक्त चाचणी हा एकमेव मार्ग आहे. तो मार्ग पटवून देण्यास राज्यातील दहा विद्यापीठांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहे. या आजाराविषयी विद्यापीठांनी एकही जागृती शिबिर आयोजित न केल्याने सिकलसेल निर्मूलनाच्या मोहिमेला हरताळ फासला गेल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त सरकारने सर्वंकष समाज विकास प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. यात २१ ऑगस्ट या दिवशी राज्यातील दहाही विद्यापीठांनी सिकलसेल या आजाराविषयी जागृती आणि चर्चा घडवून आणण्याच्या सूचना करण्यात आल्या होता. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा जागृती कार्यक्रम तरुण मुले आणि मुलींसाठी आयोजित करावा, अशा सूचना योजनेचे संपर्क प्रमुख अतुल साळुंके यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्रव्यवहारही केला होता. याकडे राज्यातील तीन प्रमुख विद्यापीठांनी सपशेल पाठ फिरवत एकही कार्यक्रम राबविला नाही. यात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांचा समावेश आहे. तर रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने अवघे दोन, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रत्येकी अवघे तीन कार्यक्रम राबविले.
विशेष म्हणजे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न १२१ महाविद्यालये कार्यरत आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या ८२०० विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थी हे सिकलसेलचे वाहक, रुग्ण आहेत. सरासरीने हे प्रमाण २.४ टक्के निघते. तर जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी १९७ महाविद्यालये संलग्न आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या २५ हजार मुलांपैकी १५७९ मुले ही कोणत्या ना कोणत्या आधारे सिलकलेसचे लाभार्थी आहेत. सरासरीने हे प्रमाणही ३.३० टक्के निघते. तर विदर्भातील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न नऊ महाविद्यालयांमध्ये ९३५ विद्यार्थी शिक्षण घेतात. यात ६१ मुले सिकलसेलचे लाभार्थी आहेत. सरासरीने हे प्रमाण २०. ३ टक्के निघते. तरीही या विद्यापीठांनी सिलकसेलबाबत जागृती मोहिमेला हरताळ फासला आहे. सिकलसेल सोयायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी मिळविलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट