म. टा. प्रतिनिधी, नागपूर
सर्वोच्च न्यायालयाने 'सीईटी'ऐवजी 'नीट'वर शिक्कामोर्तब केल्यानंतर पालक व वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली धास्ती कायम आहे. 'नीट'साठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी विद्यार्थ्यांना द्यावा, अशी पालकांची भावना आहे. त्यासाठी आज शनिवारी 'आयएमए'चे डॉक्टर रस्त्यावर उतरणार आहेत. व्हरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
शासकीय तथा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेमार्फतच (नीट) प्रवेश देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर 'नीट'चा पहिला टप्पा धाकधुकीतच पार पडला. यापूर्वी 'नीट'ऐवजी 'एमएससीईटी'द्वारे प्रवेश दिला जात होता. 'नीट'चा दुसरा टप्पा २४ जुलैला होणार आहे. अभ्यासाला कमी कालावधी मिळत असल्याने 'नीट'मधून परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी खडतर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. यावरून 'आयएमए'च्या पदाधिकाऱ्यांशी पालकांनी चर्चा केली. विद्यार्थी व पालकांची भावना पाहता आयएमएने त्यांना पाठिंबा देत रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली निघणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर असून, निर्णयाविरोधात आम्ही रॅली काढत नाही. तर, केवळ विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनापर्यंत, किंबहुना न्यायालयापर्यंत पोहोचाव्यात, यासाठीच ही रॅली काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट