मिहानच्यादृष्टीने येथील विमानतळाचा भव्यदिव्य असा विकास साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली आहे. पण, त्याला तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली आहे. आता ही निविदा ६ ऑक्टोबरला उघडली जाणार आहे. विशेष म्हणजे, या विमानतळ निविदेचा 'मटा' चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचे परिचालन सध्या राज्य सरकारच्या अधिकारातील मिहान इंडिया लिमिटेडकडे आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचीदेखील ४९ टक्के भागीदारी आहे. पण, मिहानसाठी या विमानतळाचा खासगीकरणाद्वारे विकास साधला जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा १४८० कोटी रुपयांचा आहे. तर पुढील दोन टप्पे ५८० कोटी रुपयांचे आहेत. या विमानतळाचा विकास साधण्यासाठी मे महिन्यात निविदा काढण्यात आली. त्याला फार प्रतिसाद न मिळाल्याने २५ जुलै ते २९ ऑगस्टपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कंपन्यांच्या विनंतीनुसार दुसरी मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता १४ सप्टेंबरला ही निविदा उघडली जाणे अपेक्षित होते. पण त्यालादेखील मुदतवाढ देण्यात आली आहे. पण ती अखेरची असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'निविदेसाठी उत्सुक कंपन्यांना विमानतळाचा अभ्यास करण्यासाठी आणखी कालावधी हवा आहे. त्यांच्या विनंतीनुसार आता तिसरी मुदतवाढ असली तरी ती अखेरची आहे. आता ६ सप्टेंबरला ही निविदा उघडली जाईलच. ही पात्रता प्रकारची निविदा होती. त्यातून पात्र झालेल्या कंपन्यांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले जाईल. मग अखेर विमानतळ विकासासाठी कंत्राटदार निश्चित होईल', असे मिहानला विकसित करणाऱ्या एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी 'मटा'ला सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट