म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली
रस्त्यांची दूरवस्था, बंद पडलेल्या बसेस व इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त आदिवासी विद्यार्थी व नागरिकांनी बुधवारी अहेरी तालुक्यातील वेलगूर फाट्यावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे सुमारे सहा तास आलापल्ली-मूलचेरा राज्य मार्ग ठप्प पडला होता. नंतर प्रशासनाने कार्यवाहीचे आश्वासन देत शुक्रवारी तातडीची बैठक बोलविल्याचे जाहीर केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आलापल्ली-गोमणी मार्गे मूलचेरा या राज्य मार्गावर दहा गावे आहेत. पण, या मार्गाची दूरवस्था झाल्याने बस सेवा बंद करण्यात आली आहे. पर्यायी वाहनांची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तीन-तीन दिवस वीज पुरवठा बंद राहात आहे. यासंदर्भात निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. सततच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी नागरिक रस्त्यावर उतरले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही भाग घेतला होता. पहाटे ५ वाजतापासून सकाळी १२ वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनाने या भागातली संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. सहा तास झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलकांशी चर्चा करायला पाठविले. उपविभागीय अधिकारी मा. एस. राममूर्ती यांनी गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यावर आंदोलकांनी गावातील खड्डे दाखवून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर येत्या १६ सप्टेंबरला सर्व विभाग प्रमुखांशी आपण चर्चा करून वेलगूर व परिसरातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात येईल, उद्यापासून रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासनही राममूर्ती यांनी दिले. यानंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक निलेश साळुंखे, चांगदेव कोळेकर, छाया तांबूसकर व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीने नागरिकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.
मागण्या काय?
वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करावे
बीएसएनएलची ३-जी सेवा सुरू करण्यात यावी
२२०केव्हीचे स्टेशन उभारण्यात यावे
आदिवासींचे वनहक्क पट्टे वाटण्यात यावे
२०१५-१६चे तेंदू बोनस वाटण्यात यावे
थकीत एमआरईजीएसची मजुरी द्यावी
प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात यावी
कर्मचारी मुख्यालयी राहावे
मानव विकासची बस पुन्हा सुरू करा
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट