१९९४ साली या आरोपीने वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत एका धावत्या रेल्वेगाडीत चोरी केली होती. लोहमार्ग पोलिसांनी त्याचवेळी त्याला अटक केली होती. मात्र नंतर तो जामिनावर सुटला होता. त्यावेळी तो वर्धेच्या मसाळा भागात राहात होता. मात्र, नंतर तो न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीला आलाच नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढला होता. पोलिसांनी मसाळा भागात जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा ठावठिकाणा कुठेच लागला नाही. गेल्या २२ वर्षांत परिस्थिती बदलली. त्यावेळी या आरोपीला पकडणारेही आता वर्धा लोहमार्ग ठाण्यात राहिले नव्हते. काहीजण निवृत्तही झाले होते. मात्र, वर्धा लोहमार्गचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आरोपीची शोधमोहीम सुरू झाली.
दरम्यान, हा आरोपी नागपूरला गोधनी भागात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेवटी शुक्रवारी पोलिस नायक वनस्कर, कॉन्स्टेबल भिमटे यांनी त्याला गोधनी भागात शोधून काढले. सुरुवातीला आपण प्रभाकर शेळके नावाचा आरोपी असल्याचे तो मान्य करायलाच तयार नव्हता. मात्र, अखेर त्याने आपणच तो असल्याची व २२ वर्षांपूर्वीची ती चोरी आपणच केल्याचे कबूल केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट