म.टा. प्रतिनिधी, नागपूर
पाऱ्याने ४५ चा टप्पा ओलांडला असून मे महिन्यात प्रत्येकाला मान्सूनची प्रतीक्षा असते. हा मान्सून आता अंदमानात चार दिवसांत धडकत असून विदर्भात १२ जूनला 'ऑन टाइम' प्रवेश करण्याची आशा निर्माण झाली आहे.
हवामान खाते असो वा खासगी हवामान संस्था किंवा भेंडवळची घट मांडणी या सर्वांनीच यंदा दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यात बहुतांश भागातील दुष्काळी वातावरणामुळे आता प्रत्येकालाच मान्सूनची प्रतिक्षा आहे. तर आता यंदाच्या मान्सूनची पहिली खुषखबर शुक्रवारी येऊन धडकली आहे.
'दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमानच्या समुद्रात येत्या चार दिवसांत धडकण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे', असा मान्सूनचा पहिला अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत अर्थात १७ मे रोजी अंदमानात मान्सून धडकणे नियोजित वेळ आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सून धडकण्याआधी तिथे सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. विदर्भात दोन दिवसांपूर्वी आलेला बेमोसमी पाऊस हा त्याच वातावरणाचा परिणाम होता. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तिथपासून ते मध्यप्रदेशपर्यंत पावसाची द्रोणिका तयार झाली होती. आता ही द्रोणिका सरली असली तरी उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र आहे. यामुळेच अंदमानात मान्सून धडकण्याची चिन्हे आहेत. यासोबतच तामिळनाडूच्या किनारपट्टीवर यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पण तेथील पाऊस हा बेमोसमी असेल, असे हवामान खात्याचे
म्हणणे आहे. १७ मे रोजी मान्सून अंदमानात आल्यास तो केरळातदेखील नियोजित वेळी २७-२८ जूनला धडकेल. तर अंदमान ते कोकण हा मान्सूनचा प्रवास २१ दिवसांचा असतो. त्यानुसार तो ६ ते ८ जून कोकण-मुंबईत येईल. आणि त्यानंतर पुढील टप्प्यात १२ किंवा १४ जून या नियोजित वेळी विदर्भात येईल, असा अंदाज आहे.
एकूणच अंदमानात व तिथून पुढे केरळमार्गे कोकणात मान्सून नियोजित वेळी येण्याची आशा निर्माण झाली आहे. विदर्भात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येणे जवळपास निश्चित झाले आहे. तर त्याआधी एक आठवड्यापासून मान्सूनपूर्व सरी कोसळतील. यानुसार नागपूरकर आणि वैदर्भीयांना आता उन्हाच्या झळा २० ते २२ दिवस सहन कराव्या लागणार आहेत.
--वादळ येऊ नये !
अंदमानात मान्सून वेळेत आला तरी केरळमध्ये येण्यापूर्वी अथवा त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे आजवर दिसून आले आहे. यामुळे आता यंदा अंदमान व पुढे केरळात मान्सून वेळीच येण्याची चिन्हे असताना यंदा तरी वादळ निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट