आमदार प्रकाश गजभिये यांच्या एकता गणेशोत्सव मंडळाची आरास दरवर्षी आकर्षणाचे केंद्र असते. त्यांनी यंदा हिलटॉप येथे मंत्रालयासारखा देखावा केला. शुक्रवारी मंडळातर्फे 'सैराट'फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिला आमंत्रित करण्यात आले होते. तिला बघण्यासाठी हजारो युवक-युवतींनी हिलटॉप भागात गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान आर्चीला बघण्याच्या नादात एक युवक डीपीजवळील ताराच्या संपर्कात आला. त्याला विजेचा धक्का बसला. याचवेळी धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांनी काठीने तारेला दूर केले आणि अनर्थ टळला. अक्षय वैद्य असे या युवकाचे नाव असून, त्याच्यावर रविनगरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु, या प्रकारामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची ताबडतोब तेथे धाव घेतली आणि पंचनामा केला. याठिकाणी वीजचोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महावितरणने या डेकोरेशनचे काम सांभाळणारे जब्बार खान यांच्यावर वीज अधिनियम कायदा २००३च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीकरिता ४० हजार तसेच तडजोड रक्कम म्हणून ६० हजार असा एकूण १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट