दिव्यांगांची जबाबदारी नातेवाइकांप्रमाणेच सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत. या दिव्यांग तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना पूर्ण मदत होईपर्यंत या शिबिराचा समारोप होणार नाही. वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती येत्या १५ दिवसांत गठीत करणार आहे. सरकार दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, सहाय्यक उत्पादन केंद्र एलिस्को, दिव्यांगांना नि:शुल्क मदत व संयंत्राचे वितरण करण्याच्या दृष्टीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन बल्लारपूर येथे संत तुकाराम महाराज सभागृहात करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन सभारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, शिबिरात तपासणीनंतर तीन महिन्यात दिव्यांग बांधवांना साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. यात नियमांची अडचण येणार नाही. जिथे सरकारचे काम थांबेल, तिथे आमचे काम सुरू होईल. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना मदत मिळेलच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट