आरपीएफने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत एक लाखाचा गांजा आणि जवळपास १२ हजार रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला.
सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील एका बेंचवर दोन बॅग बेवारस स्थिती पडून असल्याचे आरपीएफचे विकास शर्मा यांना आढळले. त्यांनी आजूबाजूला या बॅगविषयी विचारले, मात्र कुणीच त्या आपल्या असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा, आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक के. एन. राय, एच. एल. मीना प्लॅटफॉर्म क्र. १ वर आले. श्वानपथकालाही तेथे पाचारण करण्यात आले. श्वानाने बॅगमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे संकेत दिले. त्यामुळे या दोन्ही बॅग लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यांनी पंचांसमक्ष या बॅग उघडल्या असता त्यात साडेदहा किलो गांजा आढळून आला. या गांजाची किमत १ लाख ६ हजार रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दुपारी बेवारस स्थिती गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत १२ हजार रुपये आहे. आरपीएफचे विकास शर्मा व विक्रम यादव हे गस्तीवर असताना त्यांना एक गाठोडे बेवारस स्थितीत पडून असल्याचे दिसले. शंका आल्याने त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यात तंबाखूयुक्त विमल गुटख्याची पाकिटे आढळली. हा गुटखा जप्त करून अन्न सुरक्षा विभागाकडे सोपविण्यात आला.
गांजा, दारूची वाहतूक वाढली
गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेतून गांजा व दारूची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेजारच्या वर्धा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे तेथे नागपूर मार्गे दारूची वाहतूक केली जाते. सध्या रेल्वे स्थानकावर दिवसाआड दारूसाठा जप्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ओरिसातून येणारा गांजा नागपूर मार्गेच देशाच्या इतर भागात रेल्वेतून पाठविला जातो. या तस्करांवरही आरपीएफ तसेच लोहमार्ग पोलिस नजर ठेवून आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट