मनपाने प्रस्तावित केलेल्या हॉकर्स झोनला वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे शहरातील हॉकर्स झोन वांध्यात आले आहे. एकूण ५० पैकी ४२ जागांबाबत हरकत घेण्यात आल्याने मनपाच्या हॉकर्स झोन धोरणाला फटका बसण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे काही हॉकर्सचाही याला विरोध आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे केंद्र सरकारने देशातील सर्व मनपाला हॉकर्स झोन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर मनपाने हॉकर्स समन्वय समिती तयार केली. यात वाहतूक पोलिस प्रतिनिधी, हॉकर्सचे प्रतिनिधी आणि अशासकीय सदस्यांचा समावेश होता. ३१ जुलै रोजी या समितीची बैठक झाली. त्यानंतर १ ऑगस्टला हॉकर्स नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यासोबतच मनपाने शहरातील हॉकर्ससाठी ५० जागांची यादी तयार केली. या जागांसंबंधीत सूचना व हरकतीही मागविण्यात आल्या. या समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या जागांची यादी तयार करण्यात आली. या यादीला अंतीम रूप देण्यात आले. यातील आठ जागांवर आक्षेप आल्याने त्याला यातून वगळण्यात आले.
शहरातील पार्किंग प्रश्नावरील याचिकेवर निर्णय देताना नागपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मनपाने हॉकर्स झोन तातडीने तयार करण्याची घाई केली. या समितीने २० सप्टेंबर ही हरकती व सूचना मागविण्याची शेवटची तारीख निश्चित केली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनीच या जागांवर आक्षेप नोंदविला. सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) अश्फाक शेख यांनी आक्षेप घेत, यावर भूमिका मांडली आहे. झोनसाठी निवडण्यात आलेले अनेक ठिकाण गर्दीच्या मार्गावरील आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेत अनेक अडचणी येण्याची शक्यता वर्तविली आहे. या प्रस्तावित जागेपैकी १० मोकळ्या जागांवर वाहतूक पोलिसांचे कुठलेही आक्षेप नाहीत. या जागांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आहे. केवळ वाहतूक पोलिसच नव्हे, तर आक्षेप घेण्यात आलेल्या अनेक भागातील नागरिक व दुकानदारांनीही या जागांवर आक्षेप नोंदविले आहेत.
सीताबर्डी व्यापारी महासंघाच्या ६० दुकानदारांनी मनपाच्या या निर्णयास विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील एकूण ६० आक्षेपही मनपाकडे नोंदविले आहेत. हॉकर्स झोन ठरविताना दुकानदारांचा कुठलाही विचार करण्यात आलेला नसल्याचा आरोप महासंघाचा आहे. यात महिलांची सुरक्षितता, वाहतुकीची गर्दी, पार्किंगचा प्रश्न तसेच असमाजिक तत्त्वांचा अशा भागात असलेला वावर, याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. शिवाय, चोरी, चेनस्नॅचिंग, पाकेटमारी आणि मोबाइल चोरी यासारखे प्रकारही अशा भागात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सीताबर्डीतील व्यापारी महासंघाप्रमाणेच गांधीबाग येथील नागरिकांनीही नंगा पुतला येथील प्रस्तावित हॉकर्स झोनला विरोध दर्शविला आहे. येथील रस्ते आधीच अरूंद असताना, हॉकर्स झोनमुळे अडचणीत भर पडेल अशी भूमिका मांडली आहे.
असे आहेत प्रस्तावित जागा
नेताजी मार्केट, सीताबर्डी, टेम्पल बाजार रोड, अपना भंडार, बुटी हॉस्पिटल, जुने मॉरीस कॉलेज, मेडिकल चौकाजवळ, पाचपावली फ्लायओव्हर, गड्डीगोदाम गोल बाजार, इतवारी नंगा पुतला, रवीनगर चौक, त्रिमूर्तीनगर मटन मार्केट, जरीपटका पोलिस ठाण्यासमोर, कळमना बाजार, महाल बुधवार बाजार, तीन नल चौक, रामनगर, महाराजबाग चौक, प्रजापती चौक.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट