समुपदेशन प्रक्रियेपूर्वीच एका लिपिकाची बदली करण्यात आल्याची बाब जिल्हा परिषदेत उघडकीस आली आहे. परिणामी, बदलीला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी भगत कारवाई करणार काय, असा सवाल नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषदेत सध्या बदलीसत्र सुरू आहे. आता कृषी, पंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, बांधकाम विभागातील बदलीप्रक्रिया आटोपली आहे. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. मात्र, समुपदेशनापूर्वीच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सावनेर तालुक्यातील लिपिकाची बदली केल्याची चर्चा आहे. याबाबत महासंघाने सीईओ डॉ. कादंबरी भगत यांना निवेदन दिले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. समुपदेशनाव्यतिरिक्त बदली म्हणजे गैरव्यवहाराला खतपाणी घालण्यासारखेच आहे. त्यामुळे यात घोळ झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेवर होत आहे. संबंधित लिपिक बदलीसाठी पात्र नसतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बदली करण्याचा आल्याचा आरोपही महासंघाने केला आहे. यावरून येत्या काळात जिल्हा परिषदेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट