नागपुरातील ८ हजार ६८० कोटी रुपयांचा मेट्रो रेल्वे प्रकल्प गुणात्मकदृष्ट्याही श्रेष्ठ ठरावा, यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.ने शनिवारी गुणवत्ता नियंत्रक कक्ष सुरू केला. प्रकल्प साकारताना आर्थिकबाजूंबरोबर पर्यावरणाचा समतोलही टिकावा, यासाठी या कक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जामठा येथील मेट्रो रेल्वेच्या कास्टिंग यार्ड येथे गुणवत्ता नियंत्रक कक्षासह नमुना गोळा करणारे केंद्रही सुरू करण्यात आले असून एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते या केंद्रांचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. ब्युरो व्हेरीटास या कंपनीसोबत एनएमआरसीएलने करार केला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँक आणि केंद्रसरकार यांच्यात १ एप्रिल रोजी ३ हजार ७५० कोटी रुपयांचा करार झाल्याने प्रकल्पासमोरील आर्थिक अडचण दूर झाली आहे. आता प्रकल्पाचे काम दर्जात्मक होण्याचे मोठे आव्हान एमएमआरसीएलसमोर आहे.
आंतरराष्ट्रीय करार लवकरच मेट्रो रेल्वेसाठी लागणारे साहित्य वेगवेगळ्या देशांमधून आयात करावे लागणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारताना निकृष्ट प्रतिचे सामान येऊन प्रकल्प अडचणीत सापडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. परदेशातून आयात होणाऱ्या साहित्याची तपासणी करण्यासाठी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीची निवड करण्यात येणार आहे, असे दीक्षित यांनी यावेळी सांगितले. रोलिंग स्टॉक, रेल्वेचे डब्बे यासह विविध साहित्याची तपासणी करण्यासाठी इटलीची इटाल सर्टिफल ही कंपनी इच्छूक आहे. इटलीने तसा प्रस्ताव एनएमआरसीएलसमोर ठेवला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट