आधी जिल्ह्यातील सहा गावांतच पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाच टँकरची मागणीही वाढत आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यावर जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग सुस्त असल्याचे दिसून आले होते. यावर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे धाबे चांगलेच दणाणले. यावर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसमोर काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची माहिती आहे. अखेर आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विहिरीची पातळी कमी होत असून तलाव कोरडे पडत आहेत. त्यामुळे आता टँकरने पाणीपुरवठा करा, अशी साद नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे घातली. तरीही, जिल्हा परिषदेला जाग आली नाही. अखेर वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांनी पाणी पेटविले. आता ग्रामीण भागात १३ गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेने जानेवारीपासून उन्हाळ्यातील परिस्थिती ओळखून कामाचा आराखडा तयार केला. मात्र, प्रत्यक्षात कामाला विलंबाने सुरुवात झाली. याचे खापर गावकरी आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांवर फोडले. १३ गावांमधील टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा खर्च २५ लाखांच्या जवळपास पोहचला आहे.
तीनच तालुक्यांवर मेहरनजर! जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. नागरिकांनी टँकरची मागणीही केली. तरीही, नागपूर, कामठी आणि हिंगणा तालुक्यातच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फक्त तीनच तालुक्यांवर मेहरनजर का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अन्य ११ तालुक्यांकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि सदस्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट