नागपुरातील बहुप्रतिक्षित सकल मराठा समाज मोर्चाची तारीख रविवारच्या बैठकीत ठरू शकली नाही. या मुद्यावरून बराच खल झाला. मात्र मतभिन्नता निर्माण झाल्याने आज, सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चाची तारीख १६ की २२ ऑक्टोबर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत आहेत. या मालिकेत नागपुरातही २२ ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा समाजबांधवांनी घेतला होता. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीने या मोर्चाची १६ ऑक्टोबर ही तारीख घोषित केली. तसेच हा मराठा आणि कुणबी समाजाचा मोर्चा राहील, असा सूर व्यक्त झाला होता. यावरून रविवारच्या बैठकीत मतभिन्नता पुढे आली.
बैठकीला मराठा विद्या प्रसारक मंडळाची कार्यकारिणी, आजीवन सभासद, कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ उपस्थित होते. इतरत्र ‘सकल मराठा समाज क्रांती मोर्चा’ म्हणून निघत असताना त्यामध्ये ‘कुणबी’ हा शब्द जोडणे योग्य नाही, असे मत काहींनी चर्चेदरम्यान मांडले. तसेच कुणबी समाजाला आधीच आरक्षण असल्याने हा शब्द गाळावा, अशीही मागणी पुढे आली. १६ ऑक्टोबरला मोर्चा काढण्याला हरकत नाही. पण, तो केवळ सकल मराठा समाजाचा मोर्चा असेल, अशी भूमिका घेण्यात आली.
या मुद्यांवरून बरीच चर्चा झाली. आपसातील मतभेद दूर करून मुख्यमंत्र्यांच्या शहरात समाजाची ताकद दाखवावी. आपला मोर्चा कुठल्याही पक्षाच्या विरोधात असणार नाही, असा विचार पुढे आला. या मोर्चाच्या अनुषंगाने कोणत्याही नेत्याचे नाव पुढे न करण्याचा निर्णय झाला असल्याने, ‘हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे’, असे म्हणत या विषयावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट