गांधी सप्ताहानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नऊ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या कारवाईत १ लाख ४९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, कारवाईचे सत्र सुरूच असल्याचे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय जानराव यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गांधी सप्ताह पाळला जात आहे. स्थानिक, जिल्हा आणि विभागीय पातळीवर भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. २ ऑक्टोबरला ड्राय डे असल्याने दारू पिणे आणि विक्रीवरही बंदी पाळण्यात आली. ८ ऑक्टोबरपर्यंत विशेष सप्ताह पाळला जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अ, ब, क, ड, ई, फ असे विविध विभागानुसार तयार करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. यासह दोन भरारी पथकही आहेत. विभागीय पातळीवरही एक पथकही लक्ष ठेऊन आहे.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी अमरावती मार्गावरील भिवसेन खोरी या भागातील ९ हातभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. भरारी पथक घटनास्थळी पोहोचताच दारूची तस्करी करणारे पळून गेले. हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा ३ हजार ४५० लिटर सडवा भरारी पथकाने जप्त केला. तपास सुरू असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जानराव यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट